पाकिस्तानात ‘२६/११’ हल्ल्याची सुनावणी पुन्हा सुरू

सामना ऑनलाईन । इस्लामाबाद

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांनी मुंबईवरील ‘२६/११’ च्या हल्ल्यात पाकिस्तानचा हात असल्याची कबुली दिल्यानंतर आता पाकिस्तानात या हल्ल्याचा खटला पुन्हा सुरू झाला आहे. याप्रकरणी पाकिस्तानी न्यायालयाने दोन पाकिस्तानी साक्षीदारांना साक्ष देण्यासाठी हजर राहण्याचे आदेशही दिले आहेत.

माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांनी एका मुलाखतीत मुंबईवर हल्ला पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केला होता असे स्पष्ट सांगितले. तसेच या प्रकरणाची सुनावणी होण्यास झालेल्या दिरंगाईला पाकिस्तानी सरकार आणि सैन्याला शरीफ यांनी जबाबदार धरले होते. २७ हिंदुस्थानी साक्षीदारांच्या उपस्थितीबाबतची माहिती पुढच्या सुनावणीपर्यंत देण्यात यावी, असे आदेश पाकिस्तानी न्यायालयाने बुधवारी संबंधित अधिकाऱयांना दिले आहेत. फेडरल इन्वेस्टिगेशन एजेन्सी आणि गृह मंत्रालय आणि परराष्ट्र मंत्रालयाला सातत्याने नोटिसा पाठवूनही जानेवारी २०१६ पासून आतापर्यंत कोर्टाला न्यायालयाला हिंदुस्थानी साक्षीदारांबद्दल काहीच माहिती देण्यात आली नसल्याचे ताशेरे पाकिस्तानच्या दहशतवादविरोधी पथकाचे न्यायाधीश शाहरुख अर्जुमंद यांनी ओढले.

हा खटला अंतिम टप्प्यात आहे. केवळ दोन पाकिस्तानी अधिकाऱयांची साक्ष नोंदवायची शिल्लक आहे. फेडरल इन्वेस्टिगेशन एजेन्सी, गृह मंत्री आणि परराष्ट्र मंत्री यांना नोटीस बजावून त्यांना ठोस उत्तर देण्यास सांगितले आहे, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.

अद्याप एकाही आरोपीला शिक्षा नाही
मुंबईवरील हल्ल्याची सुनावणी जलदगतीने व्हावी म्हणून पाकिस्तान सरकारने एटीसी न्यायालयाची स्थापना केली होती. या खटल्यात आतापर्यंत ६८ पाकिस्तानी साक्षीदारांच्या साक्ष नोंदवण्यात आल्या आहेत. मात्र एकाही पाकिस्तानी आरोपीला शिक्षा सुनावण्यात आलेली नाही.