बेस्ट कामगारांचा पगार दोन दिवसांत द्या, बेस्ट कामगार सेनेची मागणी

सामना ऑनलाईन, मुंबई

मार्च महिना अर्धा उलटला तरी बेस्ट उपक्रमाच्या कर्मचाऱयांना पगार मिळालेला नाही त्यामुळे प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन येत्या दोन दिवसांत कामगारांना पगार द्यावा व त्याबाबत कामगारांना ठोस आश्वासन द्यावे, अशी मागणी बेस्ट कामगार सेनेने महाव्यवस्थापकांकडे केली आहे.

होळी सण गेला तरीही बेस्टच्या कामगारांना फेब्रुवारीचा पगार मिळालेला नाही. त्यामुळे कामगारांमध्ये संतापाचे वातावरण आहे. सध्या कामगारांना द्यायला बेस्टकडे पैसेच नसल्याचे बेस्ट प्रशासनाने स्पष्ट केले आहे. या पार्श्वभूमीवर आज बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष सुहास सामंत आणि नवनियुक्त सरचिटणीस रंजन चौधरी यांनी महाव्यवस्थापकांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. उपक्रमाची आर्थिक स्थिती ठीक नसल्याचे तुणतुणे गेली अनेक वर्षे प्रशासनाच्या वतीने वाजवले जाते. यामध्ये कामगारांचा काहीही दोष नसून केवळ नियोजनशून्य कारभारामुळे प्रशासनावर ही वेळ आली असल्याचे या निवेदनात म्हटले आहे. तसेच चुकीच्या पद्धतीने बनवलेले कॅनेडियन शेडय़ुल पुनः पुन्हा राबवून बसवाहक आणि चालकांचा शारीरिक तसेच मानसिक छळ करण्यात प्रशासन धन्यता मानत असल्याचे या निवेदनात बेस्ट कामगार सेनेने म्हटले आहे.

हा वेतन कराराचा भंग

बेस्ट उपक्रम व उपक्रमातील मान्यताप्राप्त कामगार युनियन यांच्यात यापूर्वीच वेतनाच्या तारखांसंदर्भात वेतन करार झालेला आहे. त्यानुसार महिन्याच्या १० तारखेपर्यंत उपक्रमाच्या सोयीनुसार वेतनाची रक्कम कामगारांच्या बँक खात्यामध्ये जमा झाली पाहिजे. असे असतानाही फेब्रुवारी २०१७ चे वेतन आजतागायत कामगारांच्या खात्यात जमा झालेले नाही याकडे निवेदनात लक्ष वेधले आहे.