सवा कोटी रोकडचे पार्सल लांबवणारा जेरबंद

प्रातिनिधिक फोटो

सामना प्रतिनिधी, मुंबई

गोव्याला पाठविण्यासाठी मालकाने भगवती ट्रॅव्हल्सकडे दिलेले सवा कोटीची रोकड असलेले पार्सल शिताफीने घेऊन पसार झालेल्या कर्मचाऱ्याला डोंगरी पोलिसांनी अटक केली आहे. चोरीची ती सर्व रोकड हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.
क्रॉफर्ड मार्केट येथे व्यवसाय करणारे जाफरअली लाकडावाला यांनी डोंगरी येथून सुटणाऱ्या भगवती ट्रव्हल्सकडे एक पार्सल दिले होते. त्या पार्सलमध्ये डिनर सेट तसेच तीन लाखांची रोकड असल्याचे लाकडावाला यांनी ट्रव्हल्सवाल्याला सांगितले व ते निघून गेले. त्यानंतर लाकडावाला यांच्याकडे काम करणारा यासीन अब्दुल शाहीद शेख हा ट्रॅव्हल्सजवळ आला आणि ते पार्सल मालकाने परत मागवले आहे, त्यात काही आणखी वस्तू भरायच्या आहेत, असे सांगून यासीनने ते पार्सल मागितले. यासीन ते पार्सल घेऊन न आल्याने ट्रॅव्हल्सवाल्यांनी लाकडावाला यांच्याकडे विचारपूस केली तेव्हा आपले पार्सल कोणीतरी लबाडी करून चोरून नेल्याचे स्पष्ट होताच लाकडावाला यांनी डोंगरी पोलिसात धाव घेतली. दरम्यान, हा पैसा हवालाचा असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली.

तीन लाख नाही सवा कोटी!
पोलिसांनी लगेच यासीनला ताब्यात घेऊन त्याने वेगवेगळ्या ठिकाणी लपवून ठेवलेली सवा कोटीची रक्कम हस्तगत केली. गोव्याला पाठविण्यासाठी भगवती ट्रव्हल्सकडे दिलेल्या पार्सलमध्ये तीन लाख असल्याचे लाकडावाला यांचे म्हणणे होते. पण पार्सलमध्ये एक कोटी २५ लाखांची रोकड होती.