नोटाबंदीमुळे अंगणवाडीतील बालके उपाशी,परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती

सामना ऑनलाईन।नवी दिल्ली

नोटाबंदीमुळे काय वाईट झालं असा प्रश्न विचारणाऱ्यांसाठी ही बातमी कदाचित एक महत्वाचं उत्तर ठरू शकेल. या निर्णयामुळे अंगणवाडीतील बालकांना उपाशी ठेवावं लागलं, आणि भविष्यात असं होऊ नये म्हणून अंगणवाडी चालिकांना लोकांकडून उधार घेऊन स्वत:च्या पदरचे पैसे खर्च करण्याची वेळ आली आहे. मात्र अंगणवाडीतील मुलांकडे बघून हा सगळा त्रास सहन करण्यासाठी महिला तयार आहेत कारण त्यांच्यापुढे दुसरा पर्यायच नाहीये.

black-money

मध्यप्रदेशमधील राजनंदगांवमधल्या एका अंगणवाडीतील निशा चौरसिया या कार्यकर्तीने सांगितले की या निर्णयानंतर लोकांकडून उधार घेऊन, अनेक तास बँकेबाहेर उभे राहून, अधिकाऱ्यांकडे मदत मागितली आणि स्वत:च्या कमाईतला हिस्सादेखील बालकांना आणि गर्भवती महिलांना अन्न मिळावं यासाठी खर्च केला. निशा म्हणाल्या की सध्या तरी आम्ही कसंबसं हे जमवलं आहे, मात्र जेव्हा आमच्याही मर्यादा संपतील तेव्हा या मुलांना उपाशी रहावं लागेल.

icds

एकात्मिक बालविकास कार्यक्रमाअंतर्गत देशभरात १४ लाख अंगणवाडी चालवल्या जातात. ज्यामधील ६ वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या मुलांपैकी अर्ध्याहून अदिक मुलांमध्ये शरीरातील रक्ताचं प्रमाण मर्यादेपेक्षा कमी आहे. त्यांना सकस आहार मिळावा या उद्देशानं अंगणवाडीत त्यांना अन्न देण्याचा कार्यक्रम सुरू करण्यात आला होता.

आकडेवारीमध्ये सांगायचं झालं तर नोव्हेंबर महिन्यात या बालकांना अन्नपुरवठा केला जातो त्यामध्ये ६ टक्के घट झाली आहे. याचा अर्थ हा की देशातील १६ लाख बालकांना अन्न आणि भाज्या मिळणं आवश्यक होतं, ज्या त्यांना मिळाल्या नाहीत. या महिन्यात अंगणवाडीमध्ये येणाऱ्या बालकांच्या संख्येतही घट झालेली बघायला मिळाली. नोव्हेंबर महिन्यात १६ टक्के मुली आणि १४ टक्के मुली आल्या नाहीत असं आकडे दाखवतायत.

टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना एका अंगणवाडी कार्यकर्तीने संतापलेल्या स्वरात सांगितलं की आम्ही बँकेतून एका मर्यादेपलिकडे पैसे काढू शकत नाहीये. धान्य आणि भाज्यांचे विक्रेत्यांनी देखील एका मर्यादेनंतर उधारीवर माल देणं बंद केलं. या नोटाबंदीचा बालकांनी कशाला त्रास सहन करायचा, कमीतकमी त्यांच्यासाठी तरी काही व्यवस्था करा असं या अंगणवाडी कार्यकर्तीने म्हटलंय.