कॅसिनीचे ‘समर्पण!’

[email protected]

एखादी अंतराळ मोहीम यशस्वीरीत्या पूर्ण होते त्यावेळी संशोधकांना आणि त्या मोहिमेसाठी वर्षानुवर्षे राबणाऱ्या अनेक वैज्ञानिकांना कमालीचा आनंद होतो. यश मिळाल्याचं समाधान असतं आणि एक वैज्ञानिक शोध-पर्व  संपल्याची हुरहुरही असते. गेल्या वेळी आपण व्हॉएजर यानाच्या तब्बल चाळीस वर्षांच्या प्रवासाविषयी वाचलं. सूरश्री केसरबाई केरकर यांचा स्वर घेऊन थेट सूर्यमालेपलीकडे गेलेली व्हॉएजर यानं भविष्यात एखाद्या दूरस्थ सजीवाला सापडतील का, आणि सापडलीच तर त्यावरचे मानवाने नोंदवलेले संदेश आणि समस्त पृथ्वीवासीयांची संक्षिप्त माहिती त्यांना समजेल का असे अनेक अनुत्तरित प्रश्न आहेतच. असे प्रयोग करता करताच विश्वातली अनेक गूढं उकलणार आहेत.

असाच एक यशस्वी ‘प्रयोग’ उद्या संपुष्टात येतोय. शनी ग्रहाचा जवळून परिचय करून घेण्यासाठी सुरू झालेली ‘कॅसिनी’ नावाची मोहीम उद्या थांबेल. १५ ऑक्टोबर १९९७ रोजी शनीचा उपग्रह असलेला टायटन (शनीचा एक चंद्र) आणि शनी ग्रहाभोवती असलेल्या कडय़ांचा वेध घेण्यासाठी ५७१२ किलो वजनाचं ‘कॅसिनी’ हे यान ‘नासा’ने अंतराळात धाडलं. जवळपास साडेतीन अब्ज डॉलर खर्चाची ही मोहीम तेवढीच जोखमीचीही होती. सुमारे एक अब्ज किलोमीटर अंतरावर असलेल्या शनी ग्रहाच्या अंतरंगात डोकावताना ‘कॅसिनी’ यानाला बरीच कसरत करावी लागणार होती.

ग्लोवेनी डॉम्निको कॅसिनी (१६२५-१७१२) या खगोलशास्त्र्ाज्ञाने शनी ग्रहाभोवती असलेल्या तीन कडय़ांमधील अंतराचा शोध लावला. शनीला कडी असल्याचं १६०९ मध्ये गॅलिलिओलासुद्धा जाणवलं होतं, पण त्याने त्याला शनीचे ‘कान’ असं म्हटलं. पुढे हे ‘कान’ म्हणजेच कडी किंवा ‘रिंग’ हे लक्षात आल्यावर त्याविषयी अधिक निरीक्षणं होऊ लागली आणि सतराव्या शतकातच कॅसिनी यांनी शनीच्या कडय़ांमध्ये ‘गॅप’ आहे अशीही नोंद केली. त्याच सुमारास ह्युजेन्स या संशोधकाने (१६२८-१६९५) शनीचा एक महत्त्वाचा उपग्रह असलेल्या ‘टायटन’चा शोध लावला.

म्हणूनच या दोन शास्त्र्ाज्ञांच्या नावे १९९७ मध्ये कॅसिनी यान आणि त्यावर बसवलेलं आणि पुढे टायटनवर उतरण्यात यशस्वी झालेलं ‘ह्युजेन्स’ हे अवतरका (लॅण्डर) अवकाशात झेपावलं. मजल दरमजल अंतराळी अंतर कापत कॅसिनी शनीच्या कक्षेत पोचलं आणि २५ डिसेंबर २००४ रोजी ‘ह्युजेन्स’ टायटनवर सुखरूप उतरलं! अचूक गणिती कोष्टक आणि कुशल तंत्रज्ञान यांच्या बळावर वैज्ञानिकांनी हे यश साध्य केलं. शनीच्या कडय़ांमधील अंतराच्या तसेच त्यांच्या स्वरूपाचा अभ्यास कॅसिनी यानाने केला. त्याचे ठरलेले काम पूर्ण झाल्यावर आणि इंधनाचा साठा संपत आल्यावर ते अधिक काळ अंतराळात फिरत ठेवण्यात अर्थ नव्हता. मात्र कॅसिनी, शनीच्या एखाद्या बर्फाळ उपग्रहावर आदळून तेथील वातावरण प्रदूषित होऊ नये याची खबरदारी घेत ते शनीभोवतीच्या दगड-धुळींच्या विशाल ढगांमध्ये विलीन होईल अशी व्यवस्था करण्यात आली. त्यानुसार सारे काही यथास्थित पार पडले तर उद्या १५ सप्टेंबरला म्हणजे पृथ्वी सोडल्यापासून २० वर्षे पूर्ण व्हायला बरोबर एक महिना उरलेला असताना ‘कॅसिनी’ यान आपला कायमचा निरोम घेईल.

‘कॅसिनी’ने शनीच्या कडय़ांचा अभ्यास तर केलाच पण शनीचा आणखी एक उपग्रह असलेल्या एन्सेलेडस् या उपग्रहावरच्या बर्फाचाही शोध लावला. त्यामुळे तेथे सूक्ष्म का होईना पण सजीव असण्याची शक्यता दिसू लागली. या बर्फाळ कचऱ्याखाली एखादा महासागर आहे का याचा शोध आता घेण्यात येईल. ‘कॅसिनी’ आणि ‘ह्युजेन्स’ या शास्त्र्ाज्ञांच्या नावे शनीपर्यंत गेलेल्या यानांनी खूपच मोलाची कामगिरी केली आहे. शनीच्या या उपग्रहावर जीवसृष्टी विकसित होण्याची शक्यता संशोधकांना वाटते. कॅसिनी प्रकल्पावर सातत्याने काम करणारे वैज्ञानिक कुर्ट निबर मात्र काहीसे अस्वस्थ आहेत. कारण ‘कॅसिनीचा शेवट शांतपणे होणार नसून त्याचा अखेरचा भाग जळून जाणार आहे. अर्थात असा अंत ओढवणार असला तरी कॅसिनीने विलक्षण, विस्मयकारी कामगिरी केल्याबद्दल मला समाधान आहे, असंही ते म्हणतात. संशोधनातून विश्वाचं रहस्य उलगडण्याचा ध्यास घेतलेला संशोधक यापेक्षा वेगळं काय म्हणणार! ‘कॅसिनी’ला आदरपूर्वक निरोप देऊया!