परीक्षा पुढे ढकलण्यासाठी शाळेतील विद्यार्थ्यानेच केली प्रद्युम्नची हत्या

सामना ऑनलाईन । गुरुग्राम

देशभरात खळबळ माजविणाऱ्या रायन इंटरनॅशनल शाळेतील प्रद्युम्न हत्याकांडाचा सीबीआयने छडा लावला आहे. रायन इंटरनॅशनल शाळेतच अकरावीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने परीक्षा व शिक्षक-पालक मिटींग पुढे ढकलण्यासाठी प्रद्युम्नची हत्या केल्याचे समोर आले आहे. मंगळवारी सदर विद्यार्थ्याला सीबीआयने ताब्यात घेतले होते. त्यानंतर चौकशीदरम्यान त्याने आपला गुन्हा कबूल केला आहे. आज दुपारी त्या विद्यार्थ्याला ज्युवेनाईल जस्टिस बोर्डासमोर हजर करण्यात येणार असून सीबीआय या प्रकरणात १८ नोव्हेंबरला चार्जशीट दाखल करणार आहे. दरम्यान प्रद्युम्नचा लैंगिक छळही झाला नसल्याचे सीबीआयने स्पष्ट केले आहे.

सीबीआयने मंगळवारी रात्री प्रद्युम्नच्या हत्येप्रकरणी रायन इंटरनॅशनल शाळेतच अकरावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला त्याच्या घरून ताब्यात घेतले. प्रद्युम्न प्रसाधनगृहात जात असताना हा विद्यार्थी देखील त्याच्यासोबत तेथे गेल्याचे काही जणांनी चौकशीदरम्यान सीबीआयला सांगितले होते. या विद्यार्थ्याची या आधीही पाच वेळा चौकशी करण्यात आली आहे. मंगळवारी सीबीआयने पुन्हा त्याची चौकशी केली असता त्याने प्रद्युम्नची हत्या केल्याचे कबूल केले आहे. अकरावीच्या परीक्षा व पीटीएम पुढे ढकलण्यासाठी त्याने हत्येचा कट रचला होता. त्यासाठी त्याने पंधरा दिवसांपूर्वीच सुरा विकत घेतला होता, असे सीबीआयने पत्रकार परिषदेत सांगितले.

दरम्यान, अटक करण्यात आलेल्या मुलाच्या वडिलांनी त्यांच्या मुलाला या प्रकरणात गोवले जात असल्याचा आरोप केला आहे. माझ्याच मुलाने सर्वप्रथम प्रद्युम्नचा मृतदेह बघितला होता त्यानेच शिक्षकांना सांगितले होते. मंगळवारी रात्री कित्येक तास माझ्या मुलाची चौकशी केल्यानंतर त्याला ताब्यात घेतले. तसेच त्याचा मोबाईल, लॅपटॉप व दप्तरही जप्त केले आहे, असे त्याच्या वडिलांनी सांगितले.

८ सप्टेंबर रोजी रायन इंटरनॅशनल शाळेतील पहिलीतील विद्यार्थी प्रद्युम्न ठाकूरची शाळेच्या प्रसाधनगृहात गळा चिरून हत्या केली होती. याप्रकरणी शाळेच्या बसमधील कंडक्टरला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यान प्रद्युम्नने शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिल्याने त्याची हत्या केल्याचे पोलिसांना सांगितले होते. मात्र प्रद्युम्नच्या वडिलांनी या प्रकरणात दुसऱ्याच कुणाचा हात असल्याचे सांगत सीबीआय तपासाची मागणी केली होती. त्यानंतर १५ सप्टेंबरला हे प्रकरण सीबीआयकडे सोपविण्यात आले होते.