उरण तालुक्यावर आता सीसी टिव्हीची नजर- दिघोडे नाक्यावर बसविले कॅमेरे

सामना प्रतिनिधी ।  न्हावाशेवा  

उरण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दिघोडे नाक्यावर आता सीसी टिव्हीची नजर राहणार आहे. उरण पोलीस ठाण्याच्या आवाहनावरून विंधणे पंचायत समितीच्या भाजपाच्या सदस्या दिशा प्रसाद पाटील यांनी येथे चार सीसी टिव्ही कॅमेरे बसविले आहेत. या सीसी टिव्हीचे उदघाटन शनिवारी उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक एन.बी. कोल्हटकर यांनी केले.

या सीसी टिव्हीमुळे रानसई धरण परिसर, चिरनेर गव्हाणफाटा मार्गावरील वाहतूक तसेच दिघोडे-जासई रस्त्यावरच्या घडामोडींवर नजर ठेवता येणे शक्य होणार आहे. या सीसी टिव्ही कॅमेऱ्यांमुळे या भागातील गुन्हेगारी हालचालींवर लक्ष ठेवण्यात येणार आहे. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणारे अनेक चाकरमानी गव्हाणफाटा-चिरनेर मार्गे कोकणात जातात त्यामुळे या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. तसेच या मार्गावर अनेक कंटेनर यार्ड आणि सिएफएस असल्यामुळे मोठ्या प्रमाणात अवजड वाहने ये-जा करत असतात. या वाहनचालकांना येथे लुटण्याचे प्रकार नित्यानेच घडत असतात या सर्वांवर आत्ता नजर ठेवणे शक्य होणार आहे.

उरण तालुक्यात लवकरच चिरनेर हायस्कूल नाका, कोप्रोली नाका, वशेणी खाडी, जासई नाका, बोकडविरा चारफाटा, करंजा तसेच उरण शहरात नवीन सीसी टीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार असल्याची माहिती उरणचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक एन.बी. कोल्हटकर यांनी दिली.  सर्व कॅमेरे वायफाय इंटरनेट द्वारे उरण पोलीस ठाण्याच्या कंट्रोल रूमला जोडण्यात येणार असून त्यामुळे संपूर्ण उरण तालुक्यावर पोलीस ठाण्यातून नजर ठेवणे शक्य होणार असल्याचे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाला पंचायत समिती सदस्या दिशा पाटील, उद्योजक प्रसाद पाटील, पोलीस अधिकारी आणि नागरीक उपस्थित होते.