रेल्वे स्थानकांवर लागणार चेहरे ओळखणारे सीसीटीव्ही

9

सामना प्रतिनिधी, मुंबई

मध्य रेल्वेच्या मुंबई डिव्हिजनमध्ये सध्या सुमारे तीन हजार सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत असून आता निभर्या फंडातून ‘रेलटेल’ कंपनी आणखी 2 हजार 245 कॅमेरे बसविणार आहे. या कॅमेऱयांत चेहरे ओळखणाऱ्या सॉफ्टवेअरचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे हे कॅमेरे त्वरित हालचालींना टिपून त्यांचा त्वरित आढावा घेत घुसखोरीदेखील रोखणार आहेत.

देशभरातील 6 हजार 124 रेल्वे स्थानकांवर आणि 7 हजार 200 कोचेसमध्ये 1 हजार 500 कोटींच्या खर्चातून 1.5 लाख सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची योजना आहे. मध्य रेल्वेच्या 75 स्थानकांवर आतापर्यंत तीन हजार कॅमेरे बसविण्यात आले आहेत. आता नवे 2 हजार 245 कॅमेरे ‘रेलटेल’ कंपनीमार्फत बसविण्यात येणार असल्याचे मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा बलाचे विभागीय सुरक्षा आयुक्त अश्रफ के. के. यांनी सांगितले.

सध्याचे कॅमेरे भाडय़ाचे
मध्य रेल्वेने रेल्वे स्थानकांवर बसविलेले सीसीटीव्ही कॅमेरे हे भाडय़ाचे असून कंपनीवरच त्याच्या मेंटेनन्सची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. असे एकूण 3 हजार सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. आता नवीन 2 हजार 245 कॅमेरे ‘इंटरनेट प्रोटोकॉल’ म्हणजे ‘आयपी’ ऍड्रेसवाले असणार आहेत. त्यात चेहऱयांना ओळखणाऱया सॉफ्टवेअरचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे एखादा माणूस गर्दीत घुसला तर त्याचा माग घेणे सोपे होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

आपली प्रतिक्रिया द्या