पाणी चोरीला आळा बसणार

फोटो प्रातिनिधिक

सामना प्रतिनिधी । मनमाड

शहराची बिकट पाणी परिस्थिती लक्षात घेता पाणी चोरी व गैरवापर यावर ‘वॉच’ ठेवण्यासाठी वाघदर्डी धरण, शहरातील सात पाण्याच्या टाक्या व प्रमुख वर्दळ असणाऱ्या जागांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. हा महत्त्वपूर्ण ठराव पालिकेच्या गुरुवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला.

या सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा पद्मावती धात्रक होत्या. मुख्याधिकारी डॉ. दिलीप मेनकर यांनी सभेचे संयोजन केले. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलशुद्धीकरण केंद्र व पाण्याची टाकी तसेच शहरातील काही वर्दळीच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा महत्त्वपूर्ण ठराव मंजूर करण्यात आला. दरम्यान पाण्याची टाकी हा सर्वांच्या हिताचा विषय आहे. त्यामुळे संबंधित नगरसेवकांना विश्वासात घेऊनच काम केले जाईल, अशी भूमिका गटनेते गणेश धात्रक यांनी मांडली.

संभाजीनगर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राशेजारील जागेत शॉपिंग सेंटर उभारणे, पालिका हद्दीत नवीन शौचालये व स्त्री-पुरुष स्वच्छतागृह तसेच भूमिगत गटारीचे बांधकाम करणे, शासनाच्या अल्पसंख्यांक विभागाकडून प्राप्त होणाऱ्या निधीअंतर्गत विविध विकासकामे करण्यास मंजुरी, चांदवड रोडवर होणाऱया राष्ट्रीय महामार्ग रुंदीकरणात पालिकेची पाणीपुरवठा वितरण व्यवस्थेची पाइपलाइन स्थलांतरीत करण्यास मंजुरी देणे आदी महत्त्वपूर्ण ठरावांना मंजुरी देण्यात आली.

पाणीपुरवठा, पाइपलाइन, जलकुंभ या विषयांवरील ठरावांवर सर्व सहमतीने निर्णय घ्यावा आणि हे ठराव मंजूर करावे, शहर विकासाबरोबरच जनतेला योग्य रितीने पाणीपुरवठा होणे गरजेचे आहे, असे पद्मावती धात्रक यांनी सांगितले.