आमचं बाळ सिम्बा


अदिती सारंगधर

सुचित्रा आणि आदेश बांदेकरांचा धाकटा लेक सिम्बा. अर्थात त्यांच्या सगळ्यांचा सिंबुकडी…

‘हाय, तू परत लिहिशील का?’’

‘‘बापरे, अगं आता सवय सुटलीये…

आर्टिकल वगैरे कठीण आहे गं…’’

‘‘अग पेट्स विथ सेलिब्रिटीज असा विषय आहे…’’.

‘‘हो’’.

विषय संपला…

आणि मी बऱयाच वर्षांनी हातात पेन धरलंय… फार काही भारी नसलं तरी आमच्या गप्पांना स्वरूप देण्याइतपत लिहून तुमच्यापर्यंत पोहोचवेन… प्रयत्न करीन.

चुकलं तर सांभाळा… आवडलं तर सांगा.

इथून सुरू झालं आणि दुसऱया मिनिटाला सुचित्राताईला (सुचित्रा आदेश बांदेकर) फोन केला, ‘‘अगं ऐक ना, सिम्बा कसाय? त्याच्याबरोबर गप्पा मारायच्यात आणि फोटो काढायचेयत…’’

‘‘हो’’ पलीकडून तक्षणी उत्तर आलं. कारण मुळात ती आमची मुलं आहेत… आणि आपल्या बेबीला कोणीतरी त्याच्या फक्त असण्याबद्दल इतकं महत्त्व देतंय… कोणाला तरी आम्ही सोडून त्याच्याविषयी जाणून घ्यायचंय… ही कल्पनाच कमाल वाटते…’’

भेटायचं ठरलं… नेमकी त्या दिवशी स्वामीजयंती. इतका सुंदर योग… म्हणजे आदेशदादा… (ज्याच्या पायांना नाही, गाडीला भिंगरी लावलीये) तो घरी असणार होता… वा म्हणजे फूल फॅमिली सापडणार.

भरपूर माणसाचा राबता तर बांदेकरांकडे असतोच, पण ही सगळी मंडळी सिम्बुकडीला भेटायला येणार असल्यामुळे एक विशेष आनंद… कारण आज सेलिब्रिटी सिम्बा होता…

‘‘अग, आदेशला आणि मला कुत्र्याची जाम भीती. इतकी की, ज्यांच्याकडे कुत्रा आहे तिथे मी ‘होम मिनिस्टर’चं शूटिंग करणार नाही असे आदेश सांगायचा… एवढी प्रचंड भीती आणि एक दिवस अचानक आदेशच्या एका मित्रांनी दिल्लीहून विमानातून हा हीरो आदेशच्या शूटिंग लोकेशनवर पाठवला. जेमतेम दोन महिन्यांचं बाळ माझं…’’

simba-3

दिवसभर कसंबसं व्हॅनिटीमध्ये मॅनेज केल्यावर संध्याकाळी हे बाळ आलं घरी… या बोलीवर की, ‘३ ते ४ दिवसांत योग्य असं कोणीतरी बघून त्यांना देऊन टाकू’ आणि रीतसर औक्षण वगैरे करून घेतलं घरात. घरात घेतलं ते कायमचंच… अचानक आलेली वेगळी जबाबदारी उत्साह, ऊर्जा, एन्थूझिऍझम, खूप खूप प्रेम हे व्यक्त करण्याच्या इतकं पलीकडे होतं की, तो काही क्षणापूर्वी असणारं कुत्र्याचं पिलू ‘सिम्बा आदेश बांदेकर’ झालं… सोहमचा छोटा भाऊ… सच अ वंडरफूल रिलेशन.

म्हणजे सुमित्राताई म्हणते, सोहमचं सिम्बावर सगळय़ात जास्त प्रेम आहे. पण त्याहूनही कितीतरी अधिक पटीने सिम्बाचं सोहमवर आहे.

मग गेल्या ८ वर्षांत अनेक चढउतार, सोहळे आनंद दुःख… मजामस्ती हे सगळं वाटून घ्यायला सिम्बा आमच्याबरोबर आहेच आणि आम्ही त्याच्याबरोबर वाढत गेलो.

सुरुवातीला प्रेमापोटी सगळं खायला घालायचो खरं… पण नंतर त्याला त्वचेची ऍलर्जी आहे म्हटल्यावर त्याचे खाण्याचे लाड मात्र बंद करावे लागले. बॉईल्स, टिक्स यांचा खूप त्रास म्हणजे काय असतो हे फक्त त्यांचे आई-बाबाच जाणोत. पिलू असताना आमची झाडे, सोफे, आमची कासवं याची वाट लावलीये त्यांनी, पण आपल्याला असतात तशा सगळय़ा… किंबहुना जास्तच इमोशन्स त्यांच्याकडे असतात. पण ते समजून घेणं खूप खूप अवघड असतं. कारण ते बोलू शकत नाहीत. ते फक्त आपल्या वागणुकीतून, डोळय़ांतून ते दाखवून देतात आणि आपण ते समजून घ्यायचं… कारण त्यांनाही ताणतणाव येतच असतात. पण त्यांच्यामुळे आनंद होतो.

तसं ते शहाणं बाळ आहे. आईसाठी तर पझेसिव. म्हणजे एकदा आईचा हात दुखतोय म्हणून बाबा मसाज देत होता तर सिम्बाला वाटलं मारतोय म्हणून तो भुंकला… बाबांवर.

सिम्बाला चालायचा, व्यायामाचा, फिरायचा कंटाळा… इतका की, एसी सुरू आहे तर पूर्ण दिवस तो सूसू-शी विसरून तिथेच बसणार… सोहमच्या मित्रांसह बेडरूम कॅप्चर केला तरी हा पठ्ठा तिथेच आणि बेडवर झोपायचं असेल तर मित्रांना सरळ उल्लू बनवणार. डांबरट पोरगा… भुंकून भुंकून रूमच्या बाहेर जायचं असं दाखवणार आणि दार उघडायला कोणी बेडवरून उतरलं की, त्याच्या जागेवर जाऊन थेट झोपणार… कबूतर डोक्यात जातात, मांजर आवडत नाही, कावळय़ांचा राग येतो आणि यातलं काही दिसलं तर मग पुढे बोलण्याची सोयच नाही. खायला तर सगळं आवडतं. दुर्लक्ष केलं तर खूप राग येतो त्याला, पण ज्याच्यावर जीव लावला त्याच्या जिवाला काही झालं तरी याचा जीव खालीवर. एक असाच प्रसंग…

दुधीमुळे आदेश दादाला विषबाधा झाली होती.  तेव्हा सिम्बा घरी होता. त्याला सगळय़ात आधी कळलं की, बाबाला काहीतरी होतेय आणि हा आदेश दादाच्या पायाशी सतत चाटत होता. खुर्चीखाली बसून… आणि खूप खूप गप्प… परदेशात जाताना बॅगेवर डोके ठेऊन बसणार, कोपऱयात जाऊन बसणार असं सगळं सगळं कृतीतून व्यक्त…

मध्ये तो आजारी असताना आणि नुकतंच ऑपरेशन झाल्यावर २ दिवस त्याला चालणं होत नव्हतं तेव्हा असा जीव जळला ना.

असंच एकदा तळेगावला त्याला घेऊन जात होतो. फूड मॉलवर सु सु करायला म्हणून त्याला खाली उतरवलं आणि उन्हात चालत गेल्यावर बिचाऱयाचे पाय असे काही भाजले ना… की तो उडय़ा मारायला लागला ग. त्याला आमच्या माणसांनी कसंबसं उचलून घेतलं आणि गाडीत ठेवलं तेव्हा हायसं वाटलं. त्यालापण आणि मलापण… असं जान से भी जादा जान जिधर अटकी नं वो है ये… मेरा छोटा बेबी.

एकवेळ आपल्याबद्दल किंवा कामाबद्दल बोलायला लागलं न तरी थोडय़ा वेळानं बोअर होतो. कंटाळा येतो, पण या बाळाविषयी बोलताना मी थकतच नाही.

माझं खूप शहाणं बाळ आहे गं… निर्व्याज प्रेम करणारं… आईच्या कुशीत येऊन शांत झोपणारी माझी सिम्बुकडी.