पंचवटी एक्प्रेसचा ४३वा वाढदिवस जल्लोषात साजरा

सामना ऑनलाईन । नाशिक

दररोज नाशिक-मुंबई ये-जा करणारे नाशिककर चाकरमानी, विद्यार्थी व व्यावसायिकांचे पंचवटी एक्प्रेस व सहप्रवाशांसोबत जिव्हाळ्याचे नाते निर्माण झाले आहे. या सर्वांनी एकत्रित येत आज नाशिकरोड रेल्वे स्थानकावर या एक्प्रेसचा ४३वा वर्धापनदिन मोठय़ा जल्लोषात साजरा केला. यावेळी शिवसेना खासदार हेमंत गोडसे, आमदार योगेश घोलप हेही उपस्थित होते. सन १९७५ मध्ये नाशिक-मुंबई एक्प्रेसची मागणी करण्यात आली. त्याची दखल घेऊन १ नोव्हेंबर १९७५ला रेल्वे प्रशासनाने ही पंचवटी एक्प्रेस सुरू केली.

तत्कालीन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्या हस्ते या एक्प्रेसचा शुभारंभ झाला होता. तेव्हापासून नाशिक शहरासह मनमाड, लासलगाव, निफाड, नाशिकरोड, देवळाली कॅम्प परिसरातील नोकरदार, व्यापारी, विद्यार्थी आणि मुंबईतील कामकाजासाठी जाणारे अशा हजारो प्रवाशांसाठी ही हक्काची एक्प्रेस ठरली. त्यामुळे जिल्हावासीयांच्या दृष्टीने ही एक्प्रेस अतिशय महत्त्वाची असून, ही एक्प्रेस आणि सहप्रवाशांसोबत परिवारासारखे नाते निर्माण झाले आहे.

आज ४२ वर्षे पूर्ण करून ही रेल्वे ४३व्या वर्षात पदार्पण करीत आहे. सकाळी सातच्या सुमारास तिचा आगळावेगळा वाढदिवस साजरा करण्यात आला. आकर्षक फुलांनी सजविलेल्या पंचवटी एक्प्रेसचे ढोलताशांच्या गजरात नाशिकरोड रेल्वे स्थानकावर स्वागत करण्यात आले. त्याप्रसंगी शिवसेना खासदार हेमंत गोडसे, आमदार योगेश घोलप, रेल परिषदेचे अध्यक्ष बिपीन गांधी, रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य राजेश फोकणे, स्टेशन मास्तर एम. बी. सक्सेना, रेल्वे सुरक्षा दलाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जुबेर पठाण, नितीन चिडे, तानाजी गायधनी, संयोजक राजेंद्र पाटील, चेतन बुरकुले, किरण बोरसे, दिलीप सातपुते आदी उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते या एक्प्रेसची प्रतिकृती असलेला केक कापण्यात आला, तसेच यावेळी चालक व रेल्वे कर्मचाऱ्यांचा सत्कारही करण्यात आला.

प्रारंभी दुमजली, आता २१ डब्यांची रेल्वे

प्रारंभी ही गाडी दुमजली होती. प्रवाशांची संख्या वाढत गेल्याने आधी 18, तर आता ती 21 डब्यांची करण्यात आली आहे. नियमित प्रवास करणाऱया प्रवाशांनी रेल परिषदेच्या माध्यमातून राबविलेल्या उपक्रमांमुळे यातील आदर्श कोचची लिमका बुकमध्ये नोंद करण्यात आली आहे, हेही एक वेगळेपण आहे.