हिंगोलीत हत्ती, घोडदळासह हेमंत पाटील यांची विजयी मिरवणूक

204

सामना प्रतिनिधी । हिंगोली

हिंगोली येथील लोकसभेच्या निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार हेमंत पाटील यांनी विक्रमी मताधिक्य घेत दिमाखदार विजय मिळविल्यानंतर हिंगोली शहरामध्ये २३ मे रोजी रात्री ८ वाजता हत्ती, घोडदळासह भव्य मिरवणूक काढण्यात आली. या नयनरम्य मिरवणुकीत झालेली आतीषबाजी, सर्वत्र डौलाने फडकणारे भगवे ध्वज, बँड, झांज, लेझीम पथकासह चित्त थरारक कसरती खेळांमुळे ही मिरवणूक विशेष ठरली. शिवसेनेचे नवनिर्वाचीत खासदार हेमंत पाटील यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांनी उघड्या जीपवरून अभिवादन करत जनतेचे आभार व्यक्त केले.

हिंगोली लोकसभा क्षेत्रातून महायुतीचे उमेदवार हेमंत पाटील हे काँग्रेसचे सुभाष वानखेडे यांचा २ लाख ७७ हजार ८५६ इतक्या मतांनी पराभव करुन विजयी झाले आहेत. पहिल्या फेरीपासून शिवसेनेला मिळालेले ११ हजार ९३२ मतांचे मताधिक्य शेवटच्या फेरीपर्यंत २ लाख ७६ हजार ४६४ मतांवर जाऊन पोहचले. पोस्टल मतांच्या बेरजेनंतर हे मताधिक्य २ लाख ७७ हजार ८५६ झाले. दरम्यान, शिवसेनेने निर्णायक आघाडी घेतल्याचे स्पष्ट होताच दुपारपासुनच शिवसैनिकांनी जंगी मिरवणुकीची तयारी केली.

शिवसेनेचे हिंगोली लोकसभा संपर्कप्रमुख आनंदराव जाधव, नवनिर्वाचीत खासदार हेमंत पाटील, सामाजिक कार्यकर्त्या राजश्री पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख संतोष बांगर, आमदार नागेश आष्टीकर, आमदार तानाजी मुटकुळे, माजी खासदार शिवाजी माने, माजी आमदार गजानन घुगे, जि.प. अध्यक्षा शिवराणी नरवाडे, जिल्हा समन्वयक दिलीप बांगर, धोंडु पाटील यांच्यासह नांदेड व हिंगोली जिल्ह्यातील शिवसेनेचे जिल्हा व तालुका पदाधिकारी विजयी मिरवणुकीत सहभागी झाले होते. बसस्थानकाजवळील अग्रसेन चौकापासुन या मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली. मिरवणुकीमध्ये सजवलेल्या हत्तीवरुन मिठाईचे वाटप करण्यात आले. तसेच आतषबाजी करण्यात आली. परळी, यवतमाळ, अकोला येथील बँड पथकासह स्थानिक पथकही मिरवणुकीमध्ये सहभागी झाले होते.

आदिवासी बांधवांनी डफडे वादन व नृत्य कला सादर करुन मिरवणुकीत वेगळीच रंगत आणली. यासोबतच झांझ पथक व विविध साहसी मराठमोळे खेळही मिरवणुकीमध्ये दाखविण्यात आले. अग्रसेन चौकापासून इंदिरा चौक, गांधी चौक, जवाहर रोड, आंबेडकर पुतळा, पोस्ट ऑफीस मार्गे ही मिरवणूक छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ आली. सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी छत्रपती शिवरायांना अभिवादन केल्यावर सीटीचौक मैदानावर भव्य विजयी सभा घेण्यात आली. या सभेत विजयी उमेदवार हेमंत पाटील यांनी हिंगोली लोकसभा क्षेत्रातील प्रामाणिक व बहाद्दर मतदारांचे आभार व्यक्त करत विकासासाठी कटिबध्द असल्याची ग्वाही दिली.

यावेळी हेमंत पाटील, राजश्री पाटील यांच्यासह श्रीराम पाटील यांचा भव्य पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला. शिवसेना झिंदाबाद…, जय भवानी… जय शिवाजी…, बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो… अशा घोषणा देण्यात आल्या. या मिरवणुकीमध्ये शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख परमेश्वर मांडगे, संदेश देशमुख, सुनील काळे, लोकसभा सहसंपर्कप्रमुख डॉ. रमेश शिंदे, जिल्हा संघटक उध्दवराव गायकवाड, रामेश्वर शिंदे, युवासेनेचे जिल्हा युवा अधिकारी बाजीराव सवंडकर, दिलीप घुगे यांच्यासह पदाधिकारी, शिवसैनिक, महायुतीचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.

आपली प्रतिक्रिया द्या