तू तिथं मी!

अदिती सारंगधर,[email protected]

आरती मोयेचा मॅक्सिमस वात्रट, डांबरट.. मॅक्सूडय़ा.. मन्या… अशी अनेक विशेषणं रुबाबात मिरवत मॅक्सूडय़ा आपल्या मम्माची अखंड सोबत करत असतो…

आरती तळवलकर-मोये… आता नाव वाचल्यावर तुम्हाला वाटत असणार हे कुठेतरी ऐकलंय खरं… वाचलंय खरं… पण फोटोची ओळखही नीटशी पटत नाहीय. कोण आहे ही… बहुतेक स्मिता तळवलकरांची सून असेल… अगं, सून कसं… आता तळवलकर-मोये लावलंय. मुलगी… कारण तुम्ही लावलेला एक अंदाज बरोबर आहे. ही स्मिताताईंचीच मुलगी… आरती आणि बऱयाच सिनेमे आणि मालिकांची एडिटर… म्हणजेच संकलक. नको ते कट करून आणि हवं ते सुयोग्य जुळवून समोर आणणारी… सुसूत्र संकलक… आरती तळवलकर-मोये. अर्थात याचबरोबर आता कर्व्हरटर नावाचा जो फिटनेस ब्रॅण्ड आहे त्याची फाऊन्डर… आणि संचालिका… पण आज तिची ही सगळी बिरुदं बाजूला ठेवून मॅक्सिमसची मम्मा म्हणून आलीये तुम्हाला भेटायला…

‘‘ऐक ना… आपण प्लीज ठाण्यात भेटूया? किंवा कुठेतरी बाहेर इन ठाणे? घरी शक्य होईल असं वाटत नाही. कारण स्टुडिओमध्ये जावंच लागतंय मला…’’

‘‘अगं पण आपल्याला तुझ्या डॉगूचं फोटोशूट करायचंय. नुसत्या दोघी नाही आहोत.’’

‘‘अगं मग काय तो माझ्याबरोबरच फिरतो. मी जाईन तिथे असतो…’’ एक मिनिट मला काहीच सुचलं नाही. वाटलं असेल छोट्टंसं पिल्लू… भेटल्यावर बघतेय तर चार महिन्यांचा मोठ्ठा जर्मन शेफर्ड… डांबरट शेफर्ड.

लहानपणापासूनच आमच्या म्हणजे तळवलकरांच्या घरात पेट होताच… आणि आमचे बाबा ते चोरायचे. पमाच्या बाबतीतही असंच झालं. म्हणजे असं की, ओनरला म्हणाले, जरा दोन दिवस नेऊ का घरी गं… आणि ओनर पण दोस्ती खात्यातलेच… हो म्हणायचे… आणि घरी आला की, २-४ दिवसांत एवढा लाडवायचे की, तो परत घरी जायला तयारच होईना… भुंकायलाच लागली की… मग काय आमच्या घरी… आईला (स्मिताताईंना) आधी घाण वाटायची, पण अचानक एक दिवस आई दौऱयाहून आली आणि तिला जाणवलं, साडीमध्ये काहीतरी हलतंय पायाजवळ… बघतेय तर हा छोट्टूसा फरबॉल… पमा, आमची पामेरियन… मग कसली सोडतेय तिला… जमली की गट्टी त्यांची… मी आणि अंबर डायरेक्ट दोन नंबरवर गेलो. आई तिला जेवायला वाढायची आणि आई सतत साडीवर असायची. त्यामुळे मंमम देणारी हीच असं गणित पमीने बांधलं होतं… एकदा आई दौऱयावर गेली. आम्ही हिला जेवण दिलं तर खायलाच तयार नाही… भरवायचा प्रयत्न केला, पण छे… दोन दिवस होत आले. आम्ही फूल टेन्शनमध्ये… बाबा म्हणाले, तू आईची साडी नेसून बघ गं जरा खातेय का… आणि खाल्लं की, तिनं… तिच्या आईचा वास आला तिला त्या साडीला आणि मग आई दौऱयावर, शूटिंगला गेली की, मी आपली साडीत… खरं तर तेव्हा मला कळलं, आईकडे कित्ती साडय़ा आहेत…

खरं तर मॅक्सी पण माझ्याकडे बहुतेक माझ्या प्रबळ इच्छाशक्तीमुळेच आलीये… मी आई गेल्यावर जरा एडिटची कामं कमी केली आणि फिटनेस स्टुडिओ सुरू करायचं ठरवलं… मी आणि माझ्या पार्टनरने ठरवलं की, एक वॉचडॉग म्हणून एक कुत्रा घेऊया… मग पुण्याच्या एका ब्रीडरकडून रीतसर विकत घेतलं आणि आलं येडू घरी… घरी म्हणजे माझ्या पार्टनरच्या घरी… कारण ती ठाण्यात राहाते. स्टुडिओ ठाण्यात आणि मी वाळकेश्वरला… त्यामुळे ठाणेच ठरलं. ब्रीडरने सांगितले, ४५ दिवसांचं पिल्लू आहे. कारण साधारण तेवढे दिवस तरी शक्य असेल तर त्यांना आईचं दूध पाजतात, पण हा आला तेव्हा खूपच छोटा वाटत होता. डॉक्टरकडे नेलं तर म्हणाले, १५ ते २० दिवसांचं पिल्लू आहे ते… मग काय, खूप काळजीनं त्याचं वाढवणं आलं.

तर तो आला इथे म्हणजे माझ्या मैत्रिणीकडे आणि तिला अचानक ४-५ दिवस बाहेर जावं लागलं. आता…??

‘‘आरती, तू घेऊन जाशील ना याला…’’ मला काय नेकी और पुछ पुछ… पण… मोयांकडे न्यायचं होतं… मोयांकडे सगळ्यांनाच कुत्र्यांचा राग यायचा. खरं तर नकोच ते…

‘‘याला का आणलंयस?’’ आमचे सासरे… ‘‘अहो, चार-पाच दिवस मैत्रीण बाहेर आहे. त्याला घर नाहीये राहायला म्हणून आणलंय…’’ ‘‘ओके…’’ त्यांच्या ओकेमध्ये नाराजी होती, पण चार दिवसांत तिचं रूपांतर खूप लळ्यामध्ये कसं झालं कळलंच नाही… सासऱयांची नाजूक तब्येत एका दिवसात मॅक्सीला कळली आणि तो इतका जपून वागायला लागला त्यांच्याशी… चौथ्या दिवशी त्या पिल्लाच्या अंगावर येणारं भाजरं ऊन रोखायला पप्पा (सासरे) मध्ये जाऊन उभे राहिले गं… इट वॉज सो इमोशनल… आणि चार दिवसांनी मॅक्सी गेला तेव्हा ‘‘कधी येणार’’, ‘‘कधी येणार’’ सुरू झालं… कपिल तर पहिल्या दिवसापासून न्यू बेबीचा डॅडच झाला होता. बाळाला झोपवतात तसं थोपटत, झोपवत काय होता, भरवत काय होता… मध्येच उठलं रात्री तर कडेवर घेऊन काय फिरत होता…

हुश्श… एक टेन्शन गेलं…

इतक्यात शेठ उठले. मग बाऊलभर रॉयल कॅनन खाल्लं, पाणी प्यायलं… आणि मस्तीसाठी तय्यार… केळी खूप आवडतात त्याला. सकाळी २ केळी हा त्याचा नाश्ता… मग मरीन ड्राईव्हवर वॉक… मग इथे स्टुडिओ… मग मस्ती… मग जेवण… झोप… घरी असा राजेशाही दिनक्रम आहे त्याचा… येता-जाता एसी गाडीतून फिरायला, रिक्षाने भटकायला मॅक्सीला जाम आवडतं. काकडी आवडते खायला. सोलकढी पितो चवीने… अजून मटन वा चिकनशी परिचय व्हायचाय, पण परवा मासे आणले तर स्टूलवर चढून वास घेत होता शहाणा… रस्त्यावरच्या कुत्र्यांशी मैत्री, बिल्डिंगमधल्या सगळ्यांचा फेवरेट.

‘‘आई आजारी पडायला लागल्यापासून मलाही छोटे मोठे हेल्थ इश्यू सुरू झाले. डायबेटिस डिटेक्ट झाला. स्ट्रेस सुरू झाले. डॉक्टर सुरू झाले. गोळ्या सुरू झाल्या… आणि आई गेल्यावर माझी हेल्थ खूप खराब होत गेली. भावनिकरीत्या मी खूप कमजोर झाले. एडिटिंग जे मी हट्टाने शिकले, आधी आवड म्हणून, मग पॅशन म्हणून… आईच्या जाण्याने एडिट स्टुडिओमध्ये जाणं बंद केलं… पण मॅक्सी आल्यावर आज मी फक्त एक गोळी घेतेय दिवसाला… आय ऍम सो सो सो हॅपी… माझे मूड, स्विंग्ज… स्ट्रेस, डिस्टर्बन्स… सगळं निघून नाही पळून गेलं गं… माझं बाळ… माझी सोनुडी… माझी बबडी… माझी लक चार्म… आमचा फॅमिली टाइम वाढला याच्यामुळे… मी, सासरे आणि कपिल एकत्र एका खोलीत बसून तासन्तास गप्पा मारायला लागलो. आपापले टीव्ही सेट्स बंद ठेवून… कित्ती कित्ती मोठा बदल झालाय माझ्यात… हॉटेलमध्ये हिला नाश्ता, डिनरला घेऊन जातो… असा हा मॅक्स्यूडय़ा मन्या… ‘‘आय लव्ह यू’’ म्हणताना हा उठला आणि पळाला. गाणं सुरू झालं होतं ना… झुम्बा बॅचच्या मुलींबरोबर फ्लर्ट करायला डांबरट पोरगा… साऊथ इंडियन ठरकी… आमचा!