झोरो माझा काळय़ा!


अदिती सारंगधर,[email protected]

सगळ्यांच्या जिवलगांचा शोध घेण्याचं व्यसनच मला जडलंय… पण या चार अक्षरी शब्दांची व्याख्या ज्याच्यामुळे मला समजली… त्या माझ्या लाडक्या झोरोविषयी…

मी आर्टिकल लिहीत बसले होते, रूमचा दरवाजा बंद करून. धाडकन दरवाजा उघडला आणि आमचा काळय़ा आत आला. मी बेडवर आणि तो जमिनीवर बसून माझ्याकडे बघायला लागला. ‘‘हो थांब हं. एवढं झालं की, मग खेळू. बॉल कुठं गेलाय तुझा?’’ तसा धावत गेला आणि बॉल घेऊन आला. ‘‘अरिनने (माझा मुलगा) मस्ती केली का? की झोपू देत नाहीये तो तुला? मग इथे झोप’’ हुं नाही की चुं नाही. मग काय झालंय. ‘‘आई शप्पथ, तू सगळय़ांवर आर्टिकल करतेयस. छान छान लिहितेस आणि माझ्याबद्दल कोण लिहिणार? मी तर एक नंबर गुड बॉय आहे ना तुझा’’ अस्संय होय? एवढय़ात धावत धावत अरिन आला. झोरोला मिठी मारली. त्याची किसी घेतली आणि गेला.

येस, झोरो. आमचा काळय़ा, मठू, बबडय़ा, तिलापिश, झोरूडी, बबडय़ा. काही पण आणि काहीही. 21 दिवसांचं, टप्पोरे डोळे असलेलं इवलंसं पिल्लू माझा नवरा अचानक एक दिवस घरी घेऊन आला. मला कुत्र्यांची जाम भीती वाटायची, पण इवलंसं पिल्लू होतं. सो, थोडा वेळ खेळले आणि ‘‘परत देऊन ये हे पिल्लू’’ असं सुहासला (माझ्या नवऱयाला) म्हटलं. ‘‘अगं, आजचा दिवस असू दे. उद्या देतो. खूप लेट झालाय’’ ‘‘काय रे? कुठं झोपणार हा? मी जरा इरिटेटच झाले होते, पण त्या रात्री त्या चिमुकल्याला मिठीत घेऊन झोपले ती आज आठ वर्षे. परत कधी तो प्रश्न विचारला नाही आणि सुहास उत्तर द्यायच्या फंदात पडला नाही… आणि मी पहिल्यांदा आई झाले.

दरम्यान, शूटिंग कमी केल्यानं मी घरीच असायचे, पण आमच्याकडे कधीच कुत्रा नव्हता किंवा ओळखीच्यांकडे पण. सो, त्याची डॉक्टर म्हणेल तो कायदा. रॉयल कॅननचे नगेट पाण्यात उकळून मऊ करून खायला द्यायचे, व्हिटॅमिन्स द्यायची, घरभर केलेली शी शू काढायची. तो झोपला की, थोडं आपण झोपायचं. रोजची दिनचर्या. एकदा त्याला जेवू घातलं आणि आम्ही काही कामासाठी बाहेर गेलो. जेमतेम पाऊण तास. तर घरात ठेवल्याचा त्याला इतका राग आला की, सगळय़ा न्यूजपेपरचा कचरा, झाडं आणि माती वेगळी केली आणि घरभर माती. सोफ्यावर रागात शी करून ठेवली होती. देवा रे! तेव्हाच ठरवलं की, याला सांभाळायला कोणीतरी ठेवायचंच आणि शंभू आला तो आजपर्यंत.

आजही घरी पार्टीसाठी आलेल्या प्रत्येकाला स्ट्रिक्ट इन्स्ट्रक्शन असते. झोरोला त्यानं कितीही मागितलं तर काहीही द्यायचं नाही. एवढय़ात परत धावत धावत झोरो आला. त्याच्यामागे अरिन, त्याच्यामागे मावशी. उडय़ा थांबतच नव्हत्या तेव्हा कळलं, खाली खेळायला जायचंय दोघांना. अरिननं बॉल किंवा बॉटल टाकायची आणि झोऱया ती धावत घेऊन येणार किंवा झोरो पळणार आणि अरिन त्याला पकडणार असे त्यांचे आवडते खेळ. झोरो असला की, अरिनला कोणीही नसलं तरी चालतं. स्वतः खायच्या आधी त्याला एक घास भरवणारच आणि त्यानं दिला नाही तर हक्कानं त्याच्यासमोर झोरो जाऊन बसणार. रात्री बेडरूममध्ये झोरो आल्याशिवाय अरिन झोपणार नाही. त्याला जाऊन बोलवून घेऊन येणारच आणि त्याच्या बेडवर त्याला झोपवलं की, मग येऊन झोपणार. झोरो जेवण जेवीपर्यंत ही माझीच जबाबदारी असल्यासारखं तिथं उभा राहणार आणि वेळ पडली तर ते त्याला भरवणारच. त्यामुळे झोरोही लाड करून घ्यायला तत्पर. अरिन भरवतोय म्हटल्यावर जागेवरून उठायचे कष्टही हा नाही घेणार. हे सगळं इतकं निरागस असतं ना की, कित्येकदा यांना बघून ‘‘शी।मी इतकी मोठी का झाले’’ असं वाटतं. लहान मुलांनी पेटस्बरोबर मोठं होण्यात आणि त्यांच्या सोबतीनं आपण मोठं होण्यात जी मज्जा आहे ना काय सांगू तुम्हाला?

आमच्या झोरोला थायरॉईडचा त्रास आहे. त्यामुळं त्याचं जेवण, डाएट, औषध सांभाळावं लागतं. त्याचा व्यायाम सांभाळावा लागतो. त्यामुळे कितीही आवडत असलं तरी सगळे पदार्थ नाही देता येत, पण गाजर आवडतात त्याला. ‘‘चिकन आलं’’ म्हटलं की, असेल तिथून धावत येतो. ‘‘संध्याकाळी अंडे देऊ हं’’ म्हटल्यावर नावडता दहीभातही पाच मिनिटांत संपवून टाकतो. ‘‘स्टिक’’ म्हटलं की, झोपेतूनसुद्धा जागा होतो. बेल वाजली की, त्याची ‘हम पांच’मधली ‘स्वीटी’ होते. दरवाजा उघडल्यावर जर त्याची लाडकी व्यक्ती असेल तर उडय़ा मारून मारून त्याच्याकडून लाड करून घेतल्याशिवाय आतच येऊ देत नाही आणि आत आली तरी पायाशी जाऊन ‘‘अजून अजून’’ म्हणत खाजवायला सांगणार.

तर अर्धा तास खाली खेळून आल्यावर मी पुन्हा लिहायला बसले आणि एक किस्सा आठवला, त्याला फर्स्ट टाईम पुण्याला घेऊन जातानाचा. मी सहज म्हणून पुण्याला जाण्यासाठी बॅग भरली आणि निघाले. जशी बॅग दरवाजाबाहेर ठेवली तसा हा बॅगवर जाऊन बसला. दोन पाय उंबऱयात, दोन बॅगवर. एरवी ‘‘बाय, 5 मिनिटांमध्ये येते’’ म्हटल्यावर जाऊ देणारा झोरो आज ऐकेचना. शेवटी टाकलं गाडीत आणि घेऊन गेलो पुण्याला आणि तिथून एकटा बाबाबरोबर जायला तयारच होईना. मग कसंबसं आणलं परत. एकदा सुहास कशावरून तरी ओरडला, तर रागात घराबाहेर जाऊन बसला तो येईचना घरात. मग रात्री मी शूटिंगवरून आल्यावर माझ्याकडे कम्प्लेंट केली आणि मी जेव्हा बाबाला ओरडले तेव्हा ‘‘असंच पाहिजे’’ करत आला घरात.

खरं तर लग्नाला अनेक वर्षे होऊनही आम्ही बेबीसाठी तयार नव्हतो. कारण नेहमी असं वाटायचं की, झोरोवर अन्याय होईल. पूर्वी इतका वेळ, फ्रीडम जर त्याला देऊ शकलो नाही तर… आणि तसंच झालं. गरोदर राहिल्यावर मला त्याला अंगावर उडय़ा मारू देता येईनात. त्याच्याबरोबर बॉल, बॉटल खेळता, धावता येईना. बेडवर त्याच्याबरोबर झोपता येईना, खाली बसून मांडीवर त्याला उडय़ा मारू देता येईनात, पण माझं पोरगं मात्र मम्माला फक्त समजून घेत राहिलं, मम्माबरोबर राहिलं. माझ्या वॉकच्या वेळी कितीही आवडतं जेवण असलं तरी मागून माझा गार्ड बनून फेऱया मारत राहिलं. मी घरात येईपर्यंत बाहेरच बसून राहायचं, बेडवर धावत येऊन उडय़ा मारणं बंद केलं आणि फायनली, घरी छोटं अजून एक बाळ आलं. मी अजूनच बिझी झाले, चिडचिडी झाले. राग बऱयाचदा झोरोवर निघायला लागला. रूममध्ये त्याचा प्रवेश बंद झाला होता. रूमबाहेर बसून राहायचा एकटा. मला खेळायला बोलवायचा, पण मला धावणं अलाऊड नव्हतं. तोही माझी मम्मा माझ्याशी अशी का वागतेय, माझा वेळ ती कोणाला तरी (बाळाला) देतेय म्हणून चिडचिडा झाला, थोडा ऍग्रेसिव्ह झाला. हळूहळू माझं ऐकायचा बंद झाला. माझं लाडकं पिल्लू माझ्यापासून तुटत चाललं होतं. पाच महिने झाले. झोरो माझ्यापासून लांब लांब जात होता आणि अरिनलाही त्यामुळे ऍक्सेप्ट करत नव्हता.

एक दिवस मी गेले, झोरोला मिठी मारली. खूप खूप रडले… ‘‘सॉरी!’’ म्हणतच राहिले. अरिनला बाबाच्या ताब्यात दिलं आणि दुसऱया रूममध्ये बेडवर मी आणि झोरो रात्रभर मिठी मारून पूर्वीसारखे झोपलो. सकाळी उठले तर माझा जुना झोरो माझं तोंड चाटत होता. मग (पूर्वीचा) 8 दिवस मी असंच केलं तेव्हा तो पूर्वीसारखा शांत झाला. अरिनला हळूहळू त्यानं ऍक्सेप्ट केलं, पण तरीही ती सल माझ्या मनात आहे आणि राहणार.

झोरो मात्र आता दादा झालाय. जबाबदारीनं वागतो. ‘‘आंघोळीला चला’’ म्हटल्यावर पूर्वीसारखा घरभर जाऊन लपत नाही. गुड बॉय झालाय आणि म्हणूनच आमच्या घरचा नियम आहे, कोणीही आलं तरी आधी झोरोला भेटायचं, मगच अरिनला, पण आजही कधी मला निवडायची वेळ येते तेव्हा माझी फर्स्ट प्रायोरिटी झोरोच असते. पुन्हा एकदा धावत बॉल घेऊन झोरो आला. आज मात्र दाटून आलेल्या इतक्या आठवणी कागदावर उतरवताना अश्रू अनावर झाले होते. मिठी मारून पुन्हा त्याला म्हटलं, ‘‘सॉरी पिल्ल्या, खूप सॉरी आणि मम्मा ‘लव्ह यू अ लॉट!’’