जिवलग…मॅगीचा दादा

[email protected]

श्री, चॉकलेट बॉय इ. ग्लॅमरस ओळखींपेक्षा शशांक केतकरला त्याच्या मॅगीचा दादा हीच ओळख सगळ्यात हवीहवीशी आणि जवळची वाटते…

होणार सून मी या घरची’ ही मालिका आली तेव्हा या एवढय़ा बायकांमध्ये हा एकटा मुलगा काय करणार असा प्रश्न पडला होता खरा… पण तो आला… त्याला पाहिलं… त्यानं जिंकलं आणि मग हजारो-लाखो मुलींच्या/ अगदी आज्यांच्यासुद्धा दिलाची धडकन झालेला शशांक ‘गोष्ट तशी गमतीची’ आणि आता ‘आबालाल अडकित्ते आणि मुमताज महल’ या अगदी वेगळय़ा भूमिकेमधून आपल्यासमोर आला. पण तुम्हाला तर माहितीये या सगळय़ा प्रस्तावनेपेक्षा एक व्यक्ती म्हणून एक मॅगीचा दादा म्हणून तो कसा आहे हे जाणून घ्यायला आपल्याला जास्त मज्जा येते. ही केम अक्रोस ऍज मॅच अ वॉर्म पर्सन. तशी माझी आणि त्याची जुजबीच ओळख. पण या जिवलगच्या निमित्ताने त्याच्याशी बोलले तेव्हा वरवर पक्का पुणेकर असणाऱया आणि दिसणाऱया शशांकचा एक हळवा कोपरा समोर आला. आणि त्याचं हे हळवं असणं होतं त्याच्या मॅग्गीसाठी…

वडील बँकेत नोकरी करीत असल्यामुळे सतत त्यांच्या बदल्या व्हायच्या. त्यामुळे विंचवाचं बिऱहाड होतं आमचं. एका शहरात तिथल्या वातावरणात स्थिरस्थावर होतोय, तिथल्या मित्रांमध्ये रमायला लागतोय तोपर्यंत दुसरं शहर. त्यामुळे लहानपणी अनेक ठिकाणी फिरलोय.

माझा जन्म साताऱयाचा… त्यानंतर वाईत राहिलो. मग पुण्यात आलो. मग कोल्हापूर मग परत पुणे, मुंबई. मग ऑस्ट्रेलियामध्ये आणि परत पुणे. आता फायनली मुंबई… सततच्या या फिरतीमुळे घरं बदलतं गेली. मित्र बदलत गेले आणि खूप इच्छा असूनही कोणी बेस्ट फ्रेंड नाही झालं आणि म्हणून वाटायचं की घरात कोणीतरी पेट हवा… पण त्याला फिरायचा त्रास नको म्हणून ते राहिलंच. फायनली जेव्हा पुण्याला बंगला बांधला तेव्हा हट्टानं मी आणि दीक्षानं (माझी बहीण) आई-बाबांना कन्व्हिन्स केलं की आता घरी डॉग पाहिजेच. कारण आता त्यांच्या सगळय़ा प्रश्नांवर तोडगा निघाला होता ना.

राहायला मोठ्ठं घर होतं, काळजी घ्यायला मी आणि दीक्षा होतो. आणि झोपायला आमची रूम पण होती. सो ठरवलं आणि असं कळलं की माझ्या मित्राच्या जर्मन शेफर्डला पिल्लं झाली होती. आणि त्याची आई काही ती पिल्लं ठेवू देत नव्हती. मग काय, नेकी और पूछ पूछ.. सरळ गेलो तर अनेकांनी बाकीची पिल्लं नेली होती. एक पिल्लू लुटूलुटू आपलं माझ्याकडे. असलं ग्वाड होतं राव ते… खूप खूप केस लुसलुशीत चेंडूसारखं… हातात धरलं तर इतकं बरं वाटलं. आपण प्रेमानं खाऊन टाकावंसं वाटतंय असं म्हणतो ना तसंच वाटलं. शाळेत होतो तेव्हा सगळय़ात आवडता पदार्थ मॅग्गी आणि हे पिल्लू पण आवडतच. तेव्हा काही नावाचा अर्थ साधर्म्य हा विचार करायचं वयच नव्हतं.

‘तुझी आवडीची गोष्ट काय’चं उत्तर ‘फक्त मॅग्गी’ असायचं म्हणून ही झाली आमची ‘मॅगी.’ मॅगीला आणायला गेलो तेव्हा दीक्षा एका मिलिटरी कॅम्पला गेली होती. आणि तिला पिकअप करायला सगळेच जाणार होतो… पण मी आलो नाही म्हणून ती रुसली होती. नाराज झाली होती. पण तिला कुठं माहिती होतं, एक मोठ्ठं सरप्राईज आपल्यासाठी आणायला दादा गेलाय म्हणून… घरी आल्यावर दीक्षानं मॅगीपेक्षा जास्त उडय़ा मारल्या असतील कदाचित एवढी खूष झाली. मग पुढं बऱयाचदा बराचशी सूत्रं दीक्षाच्याच हातात असायची. मॅगीचं ट्रेनिंगपण (जे काही थोडंफार ती ऐकतेय) ते दीक्षामुळेच. आय कान्ट टेल यू आमचं घर (बंगला) जो आम्हाला मोठ्ठा वाटायचा तो मॅगीच्या पळापळीनं छोटा वाटायला लागला. ऍक्च्युअली मॅगीमुळेच आम्हाला घराचा कानाकोपरा कळला. छोटीशी असताना कुठं दडून बसायची तासन्तास कळायचं नाही. च्यामारी भूक लागली की मग आपल्या गोंडस आवाजात भू ई भू ई करत खायला यायची. मग एक कार्यक्रम… मांडीवर बसून बाईंना एक एक नगेट भरवा. मग खाणार हय़ा… झालं खाऊन की परत एक वेगळाच आवाज काढणार… आधी कळायचंच नाही… नंतर कळलं… कुशन कव्हर असलेल्या मऊ मऊ बेडवर यांना झोपायचं असायचं. सुरुवातीला तिला छान सोफ्यावर ठेवायचो. मोठी व्हायला लागली तशी कसली परवानगी…. डायरेक्ट सोफ्यावर पसरायची. आम्हालाच ‘आम्ही बसू का’ अशी परवानगी मागावी लागायची.

खूप वर्षांनी बाळ झालं की कसे त्याचे अती लाड होतात तसं हे बाळही खूप वर्षांनी आलं होतं. त्यामुळे या शेंडेफळाचे तर आम्ही चौघांनी अती लाड केलेयत. गोडधोड खिलवण्यापासून ते डोक्यावर बसू देईपर्यंत सगळं करतो आम्ही तिच्यासाठी.

‘मॅगी’ आता १० वर्षांची झालीय. पूर्वीची मस्ती… दंगा… पळापळ ?? थोडी कमी झाली असली तरी तिचा शहाणपणा/ प्रेम हे मात्र वाढत गेलंय. आमचं घरसुद्धा ‘मॅगीचं घर’ म्हणून ओळखायला लागले लोक. ऍक्टर शशांक केतकरचं घर वगैरे नंतर… आणि मलाही मॅगीचा दादा म्हणूनच ओळखतात. खरं सांगू, हीच ओळख बेस्ट वाटतं. कुणाचा तरी दादा असल्याचं दादागिरी करायलाही आणि मोठा असल्यानं बेसुमार लाड करायलाही तेवढीच मज्जा येते.

मॅगी घरी आली आणि काही महिन्यांतच मी ऑस्ट्रेलियाला मास्टर्ससाठी गेलो… बापरे, इतका कठीण प्रसंग माझ्या आयुष्यात कधी आला नाही आणि येऊही नये. बॅग वगैरे भरल्यावर तिला कळलं, मी जाणार कुठेतरी. ही एका कोपऱयात जाऊन बसली. जेवली नाही. बोलली नाही. खेळली नाही. आदल्या रात्री तिला मिठी मारून मी इतका ढसाढसा रडलोय ना… बहुतेक तिला ते कळलं आणि इतकी समजून जाताना शांतपणे/प्रेमानं बाय केलं. माझं मास्टर्स झालंच नसतं. थँक्स मॅगी. तेव्हा काही स्काईप/व्हीडिओ कॉल नव्हते इतके प्रचलित. त्यामुळे फोनवरचा माझा आवाज काही तिला कळायचा नाही. पण तिची खुशाली माझे पुढचे सात दिवस सुखात घालवायची.

त्या काळात बाबा तिचा मास्टर बनले आणि त्यामुळे आजही ऐकायचं कुणाचं तर फक्त बाबांचं. बाकी आम्ही सगळे म्हणजे तिची प्यादी… ती सांगणार तसं आम्ही हलयाचं आणि आमच्या दटावण्याला तर भीकच घालत नाही. त्या लाडोबाला सगळे ब्राह्मणी पदार्थ खायला देतो. लहानपणी टीशर्ट घालून काढलेले फोटो तिला दाखवलेल्या प्राण्यांच्या फिल्म्स आणि गाडीतून तिच्याबरोबर केलेली भटकंती आहाहा गंमत. चल म्हटल्यावर मागच्या सीटवर मॅगी लिहिल्यासारखी आजही जाऊन बसते आणि निघेपर्यंत भुंकत होते.

मटण तिला आवडतं पण व्हेजिटेरियन फॅमिलीत वाढल्याने ते विरळाच मिळत. तुपाची बेरी आख्खी संपवते ती. आंबा गटवते. तिच्या वाढदिवसाला आणलेला केक फस्त करते आणि काय ‘सगळं दय़ा, खाते बाइं आमची मुलगी’ असं आई म्हणते आमची.

अगं एकदा एक मित्र घरी आला आणि मेन गेट उघडं टाकलं. बाई पळून समोरच्या बिल्डिंगच्या पार्किंगमध्ये जाऊन बसल्या. मी तास/दीड तास रडत रडत प्रत्येक घरात जाऊन ही आली का विचारत होतो. आणि रस्ता क्रॉस करून बघतोय तर ही समोरच्या पार्किंगमध्ये घाबरून बसलेली. जाऊन जवळ घेतले तेव्हा तिला आणि मला दोघांनाही इतकं रडू आलंय. मी बघितलंय गं तिला माझ्या छकूबाला रडताना.

अजून एक- तिला ना काही महिन्यांपूर्वी गाठी आल्या होत्या. कॅन्सरच्या असू शकतात या भीतीनं आम्ही सगळे पार गळून गेलो होतो. जमेल तो उपाय पासून ते देवाचा धावा सगळं केलं. आणि अचानक त्या गाठी डिसॉल्व्ह व्हायला लागल्या ते १५ दिवस आयुष्यातले इतके कठीण होते…. पण आमची मॅगी सव्हाइव्ह झाली हेल्थी ऍण्ड हॅप्पी. मुंबईत राहताना जर सगळय़ात जर काही मिस करत असेन तर मॅगी तुला.

शप्पथ मॅगू… मुंबईत मोठ्ठं घर घेतलं ना की सगळय़ात आधी तुला इथे आणून मिठी मारून बेडवर झोपायचं स्वप्न आहे माझं.