Love You Buddy

अदिती सारंगधर,[email protected]

अभिनेता श्रीकर पित्रेचा बडी… रस्त्यावरचे रेस्क्यूड बाळ… पण वागणं मात्र अत्यंत सुसंस्कारित…

‘अरे, मला माहितीये तो आर्टिस्ट,पण आवडेल का त्याला? बघ ना जरा बोलून त्याच्याशी’’ मी आमचा सहाय्यक दिग्दर्शक अभिजितला म्हटलं. माझा सीन वाचून संपेपर्यंत अभी आला आणि म्हणाला, ‘‘ओ.के. आहे. नंबर पाठवलाय तुला’’ आणि यंग ब्रिगेडमधला श्रीकर पित्रे आणि त्याचं बेबी झालं ‘जिवलग’चं पुढचं मैत्र…

‘‘हाय, अरे आवडेल ना तुला असं आर्टिकल करायला?’’ ‘‘बस काय!’’ अशी श्रीकरकडून मिळालेली पुष्टी एका सुंदर संवादाला पुरेशी होती. ‘‘आईच्या लहानपणासूनच घरी कुत्रे असल्याने तिला सवय आणि आवड दोन्ही होती. आमच्याही घरी त्यामुळे ये-जा होतीच कुत्र्यांची. ऑलवेज रेस्क्यूड डॉग किंवा रस्त्यावर पडलेले कुत्रे आम्ही घरी आणलेत. लहान असताना खेळायला बाहेर गेलो होतो. आमच्या घरासमोर माळरान असल्याने खेळताना बॉल गेला त्या शेतात आणायला म्हणून गेलो तर एकसाथ चार इमुकली चिमुकली गोंडस पिलं बागडत होती आणि समोर रस्त्यावर ‘धडाम्’ आवाज झाला. एका ट्रकनं एका कुत्रीला उडवलं. इतका राग आला होता. माणसांना उडवलं तर बरी दखल घेतात. पिलांना जेवण घेऊन येणारी त्याची आई गेली हे फक्त मला न माझ्या मित्राला कळलं.

उडवणारा तो ट्रकवाला पण गेला निघून. आता त्या पिलांचं काय करायचं म्हणून घरी आणली मित्राच्या. रात्रीच त्यातली दोघं गेली. दोघंच राहिली. ट्विन्स होते. हिरा-मोती नावं ठेवली. आईला एक आणू का विचारलं तर ‘‘नको आता तू आणि मी दोघं बिझी असतो’’ म्हणाली. हिरा-मोतीची त्याच्या बंगल्यात ठेवून आमच्यापरीनं काळजी घेत होतो, पण हायवेला त्याचं घर असल्यानं एक दिवस हिरा गाडीखाली आला. आता मात्र मोतीला डायरेक्ट घरी घेऊन आलो. एकदा मी बाहेर असताना मोती अचानक गायब झाला. बरेच दिवस गेले. पहाटे भर पावसात तीन वाजता दरवाजावर एक आवाज यायला लागला. उघडला तर बाळ मोत्या. कसा माहीत नाही, तो घरी परत आला होता आणि आला तो शेवटपर्यंत इथेच राहिला. गंमत अशी, तो शिकारी कुत्रा होता. त्यामुळे रोज समोर शेतात जाऊन एकेक उद्योग करायचा. कधी बेडूक, ससा, कबूतर, एकदा बैलाचं मुंडकं घेऊन आला. घाबरून डॉक्टरकडे नेलं तर म्हणाले, ‘‘कसले हो घाबरताय! शिकारी कुत्र्याची जात आहे.’

मोती मला समजण्याच्या वयात घरी आलेला माझा पहिला जिवलग. मग असाच ब्राऊनी आला. 14 वर्षे होता बरोबर. खूप मोठ्ठा खड्डा झाला लाईफमध्ये माझ्या पण आणि आईच्या पण. त्याच डिसेंबरमध्ये माझं लग्न होतं. म्हणून कितीही घर रिकामं वाटत असलं तरी नवीन कुत्रा आणायचा नाही. घरात गडबड, पै पाहुणे येणार, गोंधळ आहे. त्याचं करायला नाही जमलं तर… नको… नकोच ठरलं. मला खूप राग आला होता. ‘‘लग्नानंतर आणणारेय मी, आता नाही’’ असं प्रॉमिस घेतलं. डिसेंबरला लग्न झालं आणि 19 फेब्रुवारी 2016 ला माझा बड्डी आला. बायकोला कुत्रा वगैरे अजिबातच आवडत नाही, पण प्रपोझ केलं तेव्हाच सांगितलं होतं, ‘‘बाई गं। घरात कुत्रा असणार. नसला तरी येणार. तर या अटीवर काय तो निर्णय घे. हो असेल तर सांगू शकतेस आताच’’ (मला न हसणं शक्यच नव्हतं). बायको आठवडाभर बाहेर होती तेव्हाच रस्त्यावरून उचलून आणलं बडय़ाला. जेमतेम दीड महिन्याचं इवलंसं पिलू. बडीचा मी खऱया अर्थानं पालक झालो. शिस्तबिस्त फार लावायच्या फंदात पडलो नाही तरी बेसिक मॅनर्स शिकवले त्याला. त्याचं पॉट्टी ट्रेनिंग. पहिल्यांदा ज्या फडक्यावर सू केली ते नेवून ठेवलं बाथरूममध्ये. झालं, लागली सवय. तसा तो गावठी कुत्रा असल्यानं चपळ आहे. थोडा ऍग्रेसिव्ह पण आहे, पण कमांडस् ऐकून ऐकून आता तो शांत झालाय. खूप खूप बोलतो मी त्याच्याशी. त्याला बोललेलं सगळं समजतं आणि लक्षात राहतं. खूप बोललं की, तो छान माणसाळतो. तर मागचं राहिलंच की! आठवडय़ानंतर बायको घरी आली तर बेडवर मी आणि बडी झोपलोय. चिडली नाही, रुसली नाही. उलट त्या एवढय़ाशा पिलाच्या प्रेमात पडली. म्हणाली, ‘‘माहीत होतं तू कुत्रा घरात आणशील, पण दोन महिन्यांत इतकं क्यूट सरप्राईज देशील असं नव्हतं वाटलं.’’ तर अशा प्रकारे एक कार्यक्रम पार पडला.

बडी असताना मी मुंबईत शूटिंग करायचो खूप, पण दरम्यान इतका आजारी पडलो की, जवळ जवळ सहा महिने बेड रेस्ट सांगितली. जमेची बाजू अशी की, पूर्ण वेळ माझ्या बडूला देता आला आणि या सहा महिन्यांत आम्ही जास्त आपले झालो. मी झोपून असायचो. हा आणून द्यायचा खूप खेळणी. फेक ना, खेळ ना सांगायचा. बेडवर येऊन चाटत बसायचा. माझ्या शेजारी झोपायचा, पण एरवी अंगावर दणादण उडय़ा मारणाऱयाने बेड रेस्टवर असताना एकदाही उडी मारून मानेला धक्का नाही दिला. दिवसातले 24 तास एकाच ठिकाणी मला वेड लागलं असतं बडी नसता तर…‘‘ थँक यू बडी… लव यू रे’’ म्हणत बडीला मिठी मारत घेतलेला मुका. मला दिसला फोनवर.

बडीला सकाळी पाच वाजता खाली फिरायला नेतो. अनेक दिवसांची सवय असल्यानं आम्ही नाही उठवलं तरी पंजा मारून चाटून नाक घासून आम्हाला उठवतोच. इतकं गोड कुणी झोपेतून उठवतं का कुणाला? मग पहाटेची हवा खात… सब ठीक चल रहा है ना…चा आविर्भाव आणत तासभर फिरायचं. रस्त्यावरच्या कुत्र्यांना जागं करायचं आणि आपल्या घरी येऊन महालातल्या शयनकक्षात जाऊन पलंगावर पसरून द्यायचं. मग एक नाही की दोन नाही. दुपारी थोडी मस्ती, पळापळ, खेळ आणि रात्री जेवणानंतर नुसता दंगा हे आमचं रूटीन आहे. आंघोळ आणि मी अशा अनेक कविता आमच्यावर होऊ शकतील इतका आमचा उत्साह. तासाभराचा कार्यक्रम. वजनाच्या काटावर जायला नको म्हणन न्यूट्रिशन्स फॉलो करतो. डॉग फूड, भाकऱया, कधी चिकन, अंड, भात, पोळी बंदच, पण तरीही आमच्या जेवणवाल्या मावशी लाडानं तूप लावून हळूच एखादी पोळी देतातच. आम्हाला त्या कॅल्शियमच्याच स्टिक्सचं व्यसन आहे. बाहेरून कुणी आलं की, पूर्वी बांधून ठेवायचो, पण आता च्यू स्टिक्स देतो. त्यामुळे हल्ली बेल वाजली की, पहिले च्यू स्टिक्सचा हट्ट करतो, नाहीतर दरवाजाच नाही उघडू देत डांबरट. दिवसभर घरात आम्ही नसलो तरी येऊन जाऊन कामाच्या बायका असल्याने त्याला एकटं कधीच वाटत नाही, पण मी आल्यावर फेरारीच्या वेगात धावत येऊन अंगावर उडी मारणे आणि आपण तोल जाऊन पडलो की, मुटकुळं करून मांडीत बसणं त्याला फारच आवडतं. त्यालाही आणि मलाही. माझा खराखुरा बडी आहे तो आजूबाजूला सगळे असताना आणि नसतानासुद्धा!

बडय़ा, आय लव्ह यू रे, थँक यू मित्रा!