नाशिक: सैयदपिंप्रीजवळ रेल्वे रुळावर आढळला सिमेंटचा ठोकळा, घातपाताची शक्यता

9


शालिमार एक्स्प्रेसच्या इंजिनचे नुकसान

मोठा अपघात टळला

प्रतिनिधी, नाशिक

नाशिकजवळील सैयदपिंप्री येथे आज मध्यरात्री अज्ञातांनी रेल्वे रुळावर सिमेंटचा मोठा ठोकळा ठेवल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे हावडामुंबई शालिमार एक्स्प्रेसच्या इंजिनच्या पुढील बाजूचे नुकसान झाले, मात्र चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला. घातपात घडविण्यासाठी कुणी हे कृत्य केले का, याचा पोलीस शोध घेत आहेत.

खेरवाडीओढा दरम्यान सैयदपिंप्री येथे किलोमीटर २००/८ येथे अपलाईनवर मध्यरात्री पाऊण वाजता ही घटना घडली. हावडामुंबई शालिमार एक्स्प्रेस या ठिकाणी पोहोचली तेव्हा अंतर दर्शविणारा सिमेंटचा ठोकळा अज्ञातांनी काढून घेत अपलाईनच्या रुळावर टाकला होता, मात्र हा ठोकळा लक्षात न आल्याने त्यावर धडकून शालिमार एक्स्प्रेसच्या इंजिनचे कॅटल गार्ड तुटले, तसेच ठोकळाही तुटला, त्यामुळे मोठा अनर्थ टळला व रेल्वे पुढे निघून गेली, ओढा येथे ती थांबवून इंजिन बदलण्यात आले. याबाबत रेल्वेचे कालीचरण वर्मा यांच्या फिर्यादीवरून अज्ञाताविरुद्ध नाशिक तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास त्र्यंबकेश्वरचे पोलीस निरीक्षक एस. जी. मांडवकर करीत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या