सिमेंटचा टँकर मिठाईच्या दुकानात घुसला; आयटी इंजिनियर तरुणी ठार

सामना प्रतिनिधी । पुणे

मिक्स सिमेंट कॉंक्रीटची वाहतूक करणाऱ्या टँकरचा ब्रेक फेल होऊन शुक्रवारी तो थेट मिठाईच्या दुकानात घुसला. त्यावेळी खरेदीसाठी आलेली तरुणी टँकरच्या समोरच्या भागात अडकल्याने जागीच ठार झाली असून अन्य दोघे जखमी झाले आहेत. ही घटना मुंबई-बेंगलोर महामार्गावरील नवले पुलाखाली दुपारी दोनच्या सुमारास घडली.

स्वाती मधुकर ओरके (२९) असे ठार झालेल्या तरुणीचे नाव आहे. लुंकड ट्रान्सपोर्टचा एक मिक्स सीमेंट घेऊन जाणारा टँकर शुक्रवारी दुपारी दोनच्या सुमारास कात्रजकडून वारजेच्या दिशेने जात होता. त्यावेळी नवले पुलाखाली भरधाव वेगात येत असताना टँकरचे ब्रेक निकामी झाले. त्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटले आणि विश्व आर्केड कॉम्प्लेक्सच्या आवारातील दोन वाहनांना धडक देत तो सीरवी मिठाईवाले या दुकानात घुसला. त्यावेळी तेथे स्वाती ओरके आणि तीचे चार सहकारी कॉफी पीत होते. चार जण बाजूला झाले पण स्वाती टँकरच्या पुढच्या भागात अडकली. स्थानिकांनी तात्काळ तिची मदत करण्यासाठी धाव घेतली. पोलीस व अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी स्वातीचा मृतदेह टँकर बाजूला हटवून बाहेर काढला. स्वाती हिरा साँफ्टवेअर कंपनीत नोकरीला होती. ती मुळची वर्धा येथील आहे.