अण्णांच्या बहुतांश मागण्या मान्य, जलसंपदामंत्री महाजन यांची माहिती

सामना प्रतिनिधी । नगर

ज्येष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे यांच्या मागण्यासंदर्भात केंद्र व राज्य सरकार कायम सकारात्मक भूमिका घेत असून त्यांच्या बहुतांशी मागण्या मान्य करण्यात आल्याचे राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.

महाजन यांनी शनिवारी राळेगणसिद्धी येथे येऊन अण्णाशी विविध विषयांवर चर्चा केली, तसेच राज्य आणि केंद्र शासनाने अण्णांनी नमूद केलेल्या मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका घेतल्याचे त्यांना सांगितले. स्वामीनाथन आयोग लागू करण्याचा आणि पिकांना दीडपट हमीभाव देण्याचा निर्णय झाला असून येत्‍या हंगामापासून तसा दर शेतकऱ्यांना निश्‍चितपणे मिळेल असे महाजन यांनी सांगितले. याशिवाय पाण्याचा प्रश्न लक्षात घेता राज्यात ठिबक सिंचन आणि स्प्रिंकलर वापरासाठी प्रोत्साहन देण्याचा राज्य शासनाचा निर्णय आहे त्यामुळे ग्रुप साठी ठिबकसाठी साडे आठशे कोटी रुपये तरतूद करण्यात आल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

अण्णांनी नमूद केलेले काही प्रश्न हे निवडणूक आयोगाच्या अखत्यारीत असून केंद्र शासनाने यासंदर्भात निवडणूक आयोगाची पत्रव्यवहार केल्याचे महाजन यांनी अण्णांना सांगितले. पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनीही अण्णांना याबाबत कळविले आहे. केंद्रात लोकायुक्त आणि राज्यस्तरावर केंद्रात लोकपाल आणि राज्यस्तरावर लोकायुक्त यांची नियुक्ती करण्यासंदर्भात कार्यवाही सुरू झाल्याचेही महाजन यांनी अण्णांच्या निदर्शनास आणून दिले. याबाबात अण्णांनी लेखी पत्राची मागणी केली असून उपोषणाच्या निर्णयावर आपण ठाम असल्याचे त्यांनी सांगितले.