‘सावित्रीच्या लेकीं’च्या हाती लोकलचे सारथ्य

सामना ऑनलाईन । कल्याण 

जागतिक महिला दिनानिमित्त मध्य रेल्वेने आगळ्यावेगळ्या पद्धतीने सावित्रीच्या लेकींचा सन्मान केला. कल्याण-सीएसएमटी मार्गावर सकाळी आठ वाजता धावणाऱ्या लेडीज स्पेशल लोकलचे सारथ्य महिला कर्मचाऱ्यांच्या हाती दिले. महत्त्वाचे म्हणजे ‘त्या’ दोघींनी ते नेटाने सांभाळलेही. मोटरमन मुमताज काझी आणि महिला गार्ड मयूरी कांबळे यांनी ही सुसाट लोकल सीएसएमटी स्थानकात नेताच त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले.

दररोज सकाळी आठ वाजून एक मिनिटांनी कल्याण-सीएसएमटी मार्गावर खास महिला प्रवाशांसाठी जलद लोकल धावते. गुरुवारी मात्र महिला दिनाच्या पाश्र्वभूमीवर ही लेडीज स्पेशल लोकल फुगे आणि फुलांच्या माळांनी सजवली होती. याहीपेक्षा विशेष म्हणजे या लेडीज स्पेशल लोकलमध्ये सबकुछ लेडीज असाच माहौल होता. मोटरमन मुमताज काझी आणि गार्ड मयूरी कांबळे यांनी ही लोकल दिमाखात आणि बरोबर वेळेत कल्याणहून सीएसएमटी स्थानकात नेली. ही कामगिरी चोख पार पाडल्याबद्दल या सर्व महिला कर्मचाऱ्यांचा रेल्वे प्रशासन आणि प्रवासी संघटनांच्या वतीने गौरव करण्यात आला.

महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य देणार

यावेळी रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी विरेश्वर सिंह, जनसंपर्क अधिकारी ए.के.सिंग, कल्याण स्थानक प्रबंधक प्रदीपकुमार दास यांनी गुलाबपुष्प देऊन महिला प्रवाशांचे स्वागत केले. यावेळी महिला प्रवाशांनी दैनंदिन रेल्वे प्रवासात भेडसाविणाऱ्या समस्या व होणारी मानसिक कुचंबणा याकडे अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले.

यावर महिला प्रवाशांकरिता महिला स्पेशल लोकलची संख्या वाढविणे, कल्याण-सीएसएमटी मार्गावर सर्व लोकल १५ डब्यांच्या करणे व त्यात महिलांच्या डब्यांची संख्या वाढविणे, प्रत्येक स्थानकात महिलांसाठी शौचालय बांधणे, महिला डब्याजवळ पोलीस बल तैनात ठेवणे, संध्याकाळी ७ ते सकाळी ६ पर्यंत महिला डब्यात पोलीस कर्मचारी तैनात ठेवणे, लोकलमध्ये तसेच पादचारी पूल, फलाट यावर महिला प्रवाशांचे वाढते विनयभंग रोखणे याविषयी प्राधान्याने उपाययोजना हाती घेण्याचे आश्वासन यावेळी विरेश्वर सिंह यांनी महिला प्रवाशांना दिले. महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य दिले जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले.