फुकट्यांकडून दोन महिन्यांत 50 कोटींचा दंड वसूल

61

सामना ऑनलाईन । मुंबई

मध्य रेल्वेने फुकट्या प्रवाशांविरोधात राबविलेल्या धडक मोहिमेला प्रचंड यश आले आहे. लोकल व ट्रेनमधून विनातिकीट प्रवास करणाऱ्या फुकट्या प्रवाशांकडून एप्रिल ते मे 2019 अशा दोन महिन्यांत मध्य रेल्वेला तब्बल 49.47 कोटींची कमाई झाली आहे. तर एकट्या मे महिन्यातच तब्बल 26 कोटी रुपयांचा दंड वसूल झाला असल्याचे सूत्रांनी सांगितले.

विनातिकीट प्रवास करणाऱ्या आणि बेकायदेशीरपणे सामानाची वाहतूक करणाऱ्यांविरोधात मध्य रेल्वेच्या पथकाने केलेल्या कारवाईत नुकत्याच संपलेल्या मे 2019 या महिन्यात तब्बल 26.05 कोटी रुपयांचा दंड वसूल केला आहे. गेल्या वर्षी याच मे महिन्यात 16.26 कोटी रुपयांची दंड वसुली करण्यात आली होती. त्यामुळे यंदाच्या मे महिन्यातील ही रक्कम गेल्या वर्षी 2018 मध्ये केलेल्या कारवाईपेक्षा तब्बल 60.21 टक्के इतकी जादा आहे.

मे 2019 मध्ये विनातिकीट प्रवास करणाऱ्या तसेच बेकायदेशीरपणे वाहनांची वाहतूक करणाऱ्यांविरोधात राबविण्यात मोहिमेत 4.57 लाख तक्रारी दाखल करण्यात आल्या. गेल्या वर्षी मे 2018 मध्ये 3.19 लाख केसेस दाखल झाल्या. म्हणजे यंदा केससमध्येही 43 टक्क्यांनी वाढ झाली आहे. एप्रिल 2019 ते मे 2019 दरम्यान फुकटे प्रवासी तसेच बेकायदेशीर सामानाची वाहतूक करणाऱ्यांवर एकूण 8.69 लाख केसेस दाखल झाल्या, तर याच काळात गेल्या वर्षी 2018 मध्ये एकूण 7.59 केसेस दाखल झाल्या होत्या. म्हणजे गेल्या वर्षीची तुलना करताना केसेस दाखल होण्यातही यंदा 14.49 टक्के वाढ झाली आहे.

आरक्षित तिकिटांच्या हस्तांतरणाचे 879 गुन्हे
यदांच्या मे महिन्यात आरक्षित तिकिटांचे बेकायदेशीर हस्तांतरण केल्याचे 879 गुन्हे दाखल झाले आणि त्यातून दंडापोटी 7.47 लाख रुपये जमा झाले आहेत. प्रवाशांनी योग्य तिकीट काढून प्रवास करावा तसेच कोणा गैरइसमांकडून लांब पल्ल्यांची तिकिटे काढून प्रवास करू नये, असे आवाहन मध्य रेल्वेने केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या