मध्य रेल्वेचे गार्ड-मोटरमन आंदोलनाच्या पवित्र्यात

सामना ऑनलाईन । मुंबई

रेल्वे गाडय़ांची होणारी रोजची रखडपट्टी, लोकलचे तांत्रिक बिघाड, त्यामुळे होणारी प्रवाशांची आंदोलने, रेल्वेबाह्य गटांची आंदोलने आदींमुळे मेटाकुटीला आलेल्या मध्य रेल्वेला आता रेल्वेसेवेचा कणा असलेल्या मोटरमन आणि गार्डच्या आंदोलनाला तोंड द्यावे लागणार आहे. मोटरमन आणि गार्डच्या डय़ुट्या लावणाऱ्या समितीत प्रतिनिधित्व नाकारल्याने संतापलेल्या मोटरमन आणि गार्डनी संपाचा इशारा दिला आहे. प्रशासनाने दोन दिवसांत सकारात्मक प्रतिसाद न दिल्यास उद्या १ फेब्रुवारी रोजी नियमानुसार काम करण्याच्या आंदोलनाचा इशारा मोटरमन व गार्ड यांच्या विविध संघटनांनी दिला आहे.

मध्य रेल्वेवर गार्ड आणि मोटरमन यांच्या ड्युटी लावण्यासाठी एक समिती असते. दरवर्षी मोटरमनचे वेळापत्रक बदलते. या समितीवर मोटरमन आणि गार्डचेही प्रतिनिधी असतात. अंतर्गत निवडणुका होऊन  विविध कामगार संघटनांमधून हे प्रतिनिधी निवडले जातात. यासाठी यंदापासून केवळ मान्यताप्राप्त संघटनांनाच प्रतिनिधित्व देण्याचा निर्णय घेतल्याने इतर संघटनांमध्ये नाराजी आहे. त्यामुळे रेल कामगार सेनेसह एससी-एसटी रेल्वे कर्मचारी संघटनांनी सोमवारी काळ्या फिती लावून  काम केले. यातूनही प्रशासनाने धडा घेऊन दोन दिवसांत सकारात्मक निर्णय घेतला नाही तर गार्ड व मोटरमन नियमानुसार काम करतील म्हणजेच जादा ड्युटी करण्यास साफ नकार देतील इशारा दिला आहे.

फुकट्यांकडून ‘परे’ने वसूल केला सहा कोटींचा दंड

पश्चिम रेल्वेने गेल्या वर्षी डिसेंबर २०१६ मध्ये विनातिकीट प्रवास करणे, बेकायदेशीरपणे सामानाची वाहतूक करणे आदी प्रकरणांत १.७६ लाख केसेस दाखल करून एकूण ६ कोटी ७० लाखांचा दंड वसूल केला. याच महिन्यात लांबपल्ल्याचे आरक्षित प्रवासाचे तिकीट बेकायदेशीररीत्या हस्तांतरित करण्याच्या १४८ केसेस उघडकीस आणल्या असून १०२३ भिकारी, अनधिकृत फेरीवाल्यांना अटक करणे, हुसकावून लावणे आणि दंडात्मक कारवाई करण्यात आली तर १०६ जणांची तुरुंगात रवानगी करण्यात आली. पश्चिम रेल्वेच्या कमर्शियल विभागाने दलाल आणि असामाजिक तत्त्वांविरोधात सुमारे२०५ तपासणी कारवाया करून १६० व्यक्तींना अटक करून त्यांच्यावर रेल्वेच्या विविध कलमांतर्गत खटले चालवून दंड आकारला. आरपीएफच्या ‘सुरक्षिणी’ स्क्वॉडने महिलांच्या डब्यांतून प्रवास करणाऱ्या १२ वर्षांखालील १५६ शालेय विद्यार्थ्यांवर कारवाई करून त्यांना हुसकावून लावले.