मध्य रेल्वेच्या मोटरमनचे रविवारपासून आंदोलन

सामना प्रतिनिधी । मुंबई

रात्रंदिवस सलग सेवा बजावणार्‍या मध्य रेल्वेच्या मोटरमननी त्यांना मिळणार्‍या रेल्वे प्रशासनाच्या मुजोर वागणूकीचा निषेध करणार्‍यासाठी रविवार १५ ऑक्टोबरपासून जादा काम न करण्याचे ठरविले आहे. मोटरमनकडून तणावात घडणार्‍या सिग्नल चुकविण्यासारख्या घटनांमुळे थेट त्यांची नोकरीच घालविण्याची धमकी रेल्वे प्रशासनाने दिल्याने मोटरमननी आता येत्या रविवारपासून नियमानुसार काम करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे ऐन दिवाळीत मध्य रेल्वेच्या प्रवाशांवर संक्रांत येण्याची शक्यता आहे.

उपनगरीय लोकलसेवेत दर चार मिनिटाला एक लोकल याप्रमाणे १६०० हून अधिक फेर्‍या चालविल्या जातात. मुंबई उपनगरीय सेवेच्या आपल्या भौगोलिक मर्यादा असताना आता प्रचंड तणावाखाली मोटरमन काम करीत असतात. अशात काही वेळा सिग्नल चुकविण्यासारख्या चुका त्यांच्याकडून घडतात. त्यास शिक्षा करण्याचे इतर मार्ग असताना मोटरमनची थेट नोकरीच घालविण्याची धमकी मध्य रेल्वेचे वरिष्ठ विभागीय अभियंता डी.सी.सुमन यांनी दिली आहे. त्यामुळे मोटरमनच्या डोक्यावर नोकरीची टांगती तलवार असल्याने मानसिक तणावाने मोटरमनकडून उलट आणखी चुका घडण्याची शक्यता असल्याचे रेल कामगार सेनेच्या मोटरमन युनिटचे प्रवक्ते संजय जोशी यांनी सांगितले.

मध्य रेल्वेवर ८०० मोटरमन असून २३० मोटरमनच्या जागा रिक्त आहेत. अशा परिस्थितीत मोटरमन जादा काम करून रेल्वेला सहकार्य करीत आले आहेत. अशावेळी त्यांच्या डोक्यावर नोकरी जाण्याची टांगती तलवार कायम असताना ते काम कसे करणार असा सवाल केला जात आहे. एकूण १३ ते १५ मोटरमनना अशा स्पॅड किंवा ओव्हरशुटच्या सारख्या प्रकरणात दोषी ठरवून त्यांच्या नोकरीवर गदा आणण्याचा वरिष्ठ विभागीय अभियंता डी.सी.सुमन यांचा डाव असल्याचे मोटरमनचे म्हणणे आहे. त्यामुळे मोटरमननी आंदोलनाचा निर्णय घेतला असून त्यात सेंट्रल रेल्वे मजदूर संघ,सेंट्रल रेल्वे मोटरमन असोसिएशन, ऑल इंडिया ओबीसी,ऑल इंडिया एससी,एसटी यांचा पाठिंबा असल्याचे सूत्रांनी सांगितले.

एल्फिन्स्टन सारखी घटना घडल्यास रेल्वे जबाबदार

येत्या रविवारपासून मोटरमन जादा काम करणार नाहीत. त्यामुळे ६०० ते ७०० फेर्‍या दररोज रद्द कराव्या लागणार आहेत. त्यामुळे गर्दी होऊन पुन्हा एल्फिन्स्टन सारखी घटना घडल्यास रेल्वेच जबाबदार असणार असल्याचा इशारा मोटरमन संघटनेने दिला आहे. रेल कामगार सेनेचे अध्यक्ष खासदार आनंदराव अडसूळ यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होत असून मोटरमनच्या पाठिशी रेल कामगार सेना असल्याचे सरचिटणीस दिवाकर उर्फ बाबी देव यांनी सांगितले.