रुळाला तडे गेले आणि मध्य रेल्वेची वाहतूक पुन्हा ठप्प झाली

फाईल फोटो

सामना प्रतिनिधी । अंबरनाथ

विविध कारणांमुळे जवळपास रोज विस्कळीत होणाऱ्या मध्य रेल्वेच्या सेवेला शुक्रवारी रुळाला तडे जाण्याचं कारण मिळालं. अंबरनाथ बदलापूर दरम्यान रुळाला तडे गेल्याने अप दिशेची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. ही वाहतूक केव्हा सुरू होईल हे सांगता येणं कठीण आहे. मंगळवारी कल्याण स्थानकात एका महिलेचा लोकल खाली येऊन मृत्यू झाल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. त्याच दिवशी हार्बर मार्गावर पेंटाग्राफ तुटल्याने तिथली वाहतूक ठप्प झाली होती.

या वर्षी मध्य रेल्वेची वाहतूक इतके वेळा विस्कळीत झाली आहे की त्याची मोजणी करणं आता अवघड होऊ लागलं आहे. डिसेंबर महिन्यात मध्य रेल्वेची वाहतूक कोणत्या कारणांमुळे विस्कळीत झाली होती ते वाचा…

  • ६ डिसेंबरला दिवा स्थानकाजवळ मालगाडीचा डबा घसरल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. यामुळे लोकलच्या अनेक फेऱ्या रद्द कराव्या लागल्या होत्या.
  • ८ डिसेंबरला वाशिंद इथे रोजच्या वेळेपेक्षा लोकल ट्रेन ५० मिनिटं उशिरा आल्याने प्रवाशांचा संतापाचा उद्रेक झाला होता, त्यातच लांब पल्ल्याच्या गाड्या लोकल ट्रेनच्या आधी सोडल्याने प्रवाशांची ट्रॅकवर उतरून आंदोलन केलं होतं.
  • १८ डिसेंबरला आसनगाव आणि खर्डी दरम्यान रुळाला तडे गेल्याने वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.
  • २१ डिसेंबरला तर कहरच झाला होता, मध्य रेल्वे आणि हार्बर रेल्वे सोबतच पश्चिम रेल्वेचीही वाहतूक विस्कळीत झाली होती. अंधेरी स्थानकाजवळ सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने इथे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. मध्य रेल्वेची वाहतूक धुक्यामुळे विस्कळीत झाली होती तर हार्बर रेल्वे बेलापूरजवळ ओव्हरहेड वायर तुटल्याने विस्कळीत झाली होती.