मध्य रेल्वेला लेटमार्क!

दोन महिन्यांपासून सुरू असलेले मध्य रेल्वेच्या लटकंतीचे रडगाणे आज नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या दिवशीही सुरू होते. बाहेरून येणाऱया लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेस गाडय़ांना विलंब झाल्याने भायखळा येथे अप जलद मार्गावरील अनेक लोकल गाडय़ा अप धीम्या मार्गावर वळवण्यात आल्या होत्या. त्यामुळे गाडय़ांची लटकंती झाल्याने दुपारी अनेक गाडय़ा माटुंगा, दादर, परळ, चिंचपोकळी स्थानकानजीक बराच वेळ उभ्या राहत असल्याचे चित्र होते. त्यामुळे अप धीम्या आणि जलद मार्गावर गाडय़ा सुमारे अर्धा तास विलंबाने धावत असल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. मध्य रेल्वेने हार्बर मार्गावर घेतलेल्या 42 दिवसांच्या ब्लॉकमुळे प्रवाशांचे मोठय़ा प्रमाणात हाल झाले असून मेन लाइनवरही वेगवेगळय़ा तांत्रिक बिघाडामुळे प्रवाशांचा खोळंबा होत आहे. गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेला खोळंब्याचा कार्यक्रम आज महिन्याच्या पहिल्या दिवशीही सुरू होता. जलद मार्गावरील गाडय़ा धीम्या मार्गावर वळवल्याने धीम्या मार्गावरील गाडय़ांना लेटमार्क लागला. नेहमीच वेगवेगळय़ा कारणाने होणाऱ्या लटकंतीमुळे प्रवाशांकडून संताप व्यक्त केला जात होता.