केंद्रीय पथकाकडून अरणगाव येथे दुष्काळी परिस्थितीची पाहणी शेतकऱ्यांशी साधला संवाद

सामना प्रतिनिधी । जामखेड

पावसाने ओढ दिल्याने जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली. या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी केंद्र सरकारचे तीन सदस्यीय पथक दि. 5 रोजी जामखेड तालुक्यातील अरणगाव येथे सायंकाळी पाचच्या सुमारास दाखल झाले. टंचाई परिस्थितीची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला. प्रत्यक्ष वस्तुस्थिती आणि जिल्हा प्रशासनाकडून घेतलेली माहितीचा अहवाल केंद्र शासनाकडे सादर करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

केंद्रीय विभागाचे सहसंचालक सुभाषचन्द्र मीना यांच्या नेतृत्वाखालील तीन सदस्य पथकाने अरणगाव येथील शेतकरी महादेव श्रीरंग शिंदे यांच्या शेतातील पावसाअभावी करपलेल्या लिंबोणी व कपाशीची पाहणी केली. यावेळी अनेक ग्रामस्थांनी गुरांसाठी चारा पाणी उपलब्ध करावा अशी मागणी केली.

यावेळी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वजीत माने, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पंडीत लोणारे,प्रांतधिकारी अर्चना नष्टे, शिर्डीचे प्रांताधिकारी रविंद्र ठाकरे, पोलीस उपअधीक्षक सुदर्शन मुंडे, सभापती सुभाष आव्हाड, तहसिलदार विशाल नाईकवडे, कृषी अधिकारी सुधीर शिंदे, गटविकास अधिकारी सुहास जगताप, मंडल कृषी अधिकारी सुंदरदास बिरगळ, सरपंच अंकुश शिंदे ग्रामसेवक महेश जगताप, तलाठी शेख माजी सरपंच आजिनाथ ननावरे, नवनाथ ससाणे, जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

केंद्रीय पथकातील अर्थ व व्यय विभागाचे सहसंचालक सुभाषचंद्र मिना यांनी हिंदीतून शेतकरी महादेव शिंदे यांच्याशी संवाद साधत लिंबोणी कधी लावली, मागील वर्षी उत्पन्न किती होते, जनावरे किती आहेत, पाण्याची काय सोय आहे, कुटुंबात किती व्यक्ती आहेत अशी माहिती विचारली. त्यावर सदर शेतक-याने साहेब, दुष्काळाने शिवार उध्वस्त झालाय, जनावरांच्या चाऱ्याचा व पाण्याचा प्रश्न अवघड झाला आहे. या शब्दात व्यथा मांडली.

यावेळी उपस्थित पत्रकारांशी संवाद साधताना केंद्रीय पथक प्रमुख सुभाषचंद्र मिना म्हणाले, धीर सोडू नका आम्ही परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आलो आहोत. पाहणीचा अहवाल केंद्र सरकारला सादर करणार आहोत. जिल्हा प्रशासनाने आम्हाला जिल्ह्यातील पाणी टंचाई , पिक परस्थिती, पशुधन, उपलब्ध पाणीसाठा याचा विस्तृत अहवाल दिला आहे. सरकारकडून योग्य उपाययोजना केल्या जातील या शब्दात दिलासा दिला.

यानंतर पथक कर्जत तालुक्यात दुष्काळाची पाहणी करण्यासाठी निघून गेले.