मालवण नगरपरिषद शतकमहोत्सवी वर्षाची १ मे रोजी सांगता

सामना प्रतिनिधी । मालवण

मालवण नगरपरिषद यावर्षी शतकमहोत्सव साजरा करत आहे. यानिमित्त पालिकेच्या वतीने २९, ३० एप्रिल व १ मे या तीन दिवसीय कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शतक महोत्सव सोहळ्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना निमंत्रित करण्यात आले असून केंद्रीय हवाई उड्डाणमंत्री सुरेश प्रभू महोत्सवाचे स्वागताध्यक्ष पद भूषवणार आहेत, अशी माहिती नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी दिली.

मालवण नगरपरिषदेची स्थापना १९१८ साली करण्यात आली होती. २०१७ पासून शहरात पालिकेच्या शतक महोत्सवानिमित्त विविध सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक कार्यक्रम राबविले गेले. शतक महोत्सवी वर्षाची सांगता १ मे रोजी करण्यात येत असून यासाठी पालिकेच्या सांस्कृतिक विभागाने नियोजन केलेल्या विविध सांस्कृतिक, क्रीडा कार्यक्रमांची रूपरेषा नगराध्यक्ष कांदळगावकर यांनी जाहीर केली. यावेळी आरोग्य तथा सांस्कृतिक सभापती आप्पा लुडबे, बांधकाम सभापती सेजल परब, नगरसेवक मंदार केणी, सुदेश आचरेकर, दीपक पाटकर, नितीन वाळके, पंकज साधये, यतीन खोत, आकांक्षा शिरपुटे, सुनीता जाधव, संमेश परब, गुरुनाथ राणे आदी उपस्थित होते.

पालिकेचे सांस्कृतिक कार्यक्रम टोपीवाला हायस्कुलच्या बोर्डिंग मैदानावर होणार असून २९ रोजी सायंकाळी ६.३० वाजता महोत्सव उदघाटनाचा कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर सुप्रसिद्ध गायक प्रसेनजीत कोसंबी, युवा गायिका ज्यूई जोगळेकर यांची बहारदार गीते तर सिने अभिनेत्री नृत्यांगना सारा श्रवण यांची नृत्यांची अदाकारी अनुभवता येणार आहे. ३० रोजी स्थानिक कलाकारांचे निवडक मनोरंजनात्मक सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. त्यानंतर रुपेश नेवगी यांचे सॅन्ड आर्ट शो आणि डबिंग स्टार मेघना येरंडे यांचा विशेष कार्यक्रम होईल.

शतक महोत्सव सोहळ्याची १ मे रोजी सायंकाळी ६ वाजल्यापासून सांगता होणार आहे. अखेरच्या दिवशी गायक राहुल सक्सेना, विश्वजित बोरवणकर व कविता राम यांचा धमाकेदार गीतांचा ऑर्केस्ट्रा तर अभिनेती सुप्रिया पाठारे व अतुल तोडणकर यांची तुफान कॉमिडी शोचे आयोजन करण्यात आले आहे.

पालिका व क्रीडाई संस्थेच्या वतीने शतक महोत्सवानिमित्त २१ व २२ एप्रिल रोजी इंटरप्रभाग टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. विजेत्या व उपविजेत्या संघांना अनुक्रमे २५ हजार, १५ हजार रुपये व चषक तसेच उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक व मालिकावीर यांना प्रत्येकी १ हजार ५०० रुपयांची रोख पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. स्पर्धेत आठ संघ सहभागी होणार असून प्रत्येक संघाचा मालक त्या प्रभागातील नगरसेवक असणार आहे. आठही संघांना प्रभागनिहाय ड्रेसकोड देण्यात येणार आहे. यावेळी नगरसेवक व पत्रकार यांचा प्रदर्शनीय सामनाही यावेळी होईल. तसेच २१ व २२ रोजी बॅडमिंटन स्पर्धा १३, १५, १७ १९ वयोगटासाठी होणार आहे. यात मुली, मुलगे सहभागी होऊ शकतात. अधिक माहितीसाठी नगरपालिकेशी संपर्क साधावा, असे नगराध्यक्ष कांदळगावकर यांनी सांगितले.

महोत्सवाच्या सांगता समारंभाप्रसंगी पालिकेच्या शंभर वर्षाच्या इतिहासात नगराध्यक्ष, नगरसेवक पद भूषविलेल्या आजी-माजी व्यक्तींचा सत्कार करण्यात येणार आहे. तसेच पालिकेच्या शंभर वर्षाची यशोगाथेचे दर्शन घडविण्याऱ्या स्मरणिकेचे प्रकाशन होणार आहे. शहरातील विशेष प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांचाही गौरव केला जाणार असून साई पारकर यांच्या रांगोळीचे भव्य प्रदर्शन बोर्डिंग मैदानावर असणार आहे. महोत्सवादरम्यान, विविध खाद्य पदार्थांचे तसेच वस्तू विक्रीचे स्टॉल लागणार आहेत, असे कांदळगावकर यांनी सांगितले.

पालिका शतक महोत्सवी कार्यक्रम करत असताना सर्वपक्षीय नेत्यांना निमंत्रण देण्यात येणार आहे. यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू, गृहराज्यमंत्री दीपक केसरकर, बंदर विकासमंत्री रवींद्र चव्हाण, माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे, खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, आमदार नीतेश राणे, माजी खासदार निलेश राणे आदी नेतेमंडळी उपस्थिती दर्शवतील, असा विश्वास नगराध्यक्ष व उपस्थित नगरसेवकांनी व्यक्त केला.