‘चला हवा येऊ द्या’चा आज शेवटचा एपिसोड…

सामना ऑनलाईन । मुंबई

अवघ्या महाराष्ट्राला खळखळून हसायला लावणारा, गेल्या तीन वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारा ‘चला हवा येऊ द्या’ हा कार्यक्रम प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची मेजवानीच ठरला आहे. ‘कसे आहात मंडळी, हसताय ना?… हसायलाच पाहिजे!’चा संदेश देत संपूर्ण महाराष्ट्राला या टीमने वेड लावले आहे. दरवेळी काहीतरी नवीन विषयासह येणारा हा कार्यक्रम प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. अर्थात काही वेळासाठीच ही विश्रांती असेल असं सांगण्यात आलं आहे.

मराठी प्रेक्षकांना आपल्या मनोरंजनाने खिळवून ठेवणारा हा कार्यक्रम काही दिवसांतच मराठी घराघरांत पोहचला. अनेक मराठी आणि हिंदी चित्रपट तसेच नाटकांना ‘चला हवा येऊ द्या’ एक प्रसिद्धीचे प्रभावी माध्यम ठरले.

‘चला हवा येऊ द्या’च्या या थुकरटवाडीत निलेश साबळे, भाऊ कदम, कुशल बद्रिके, सागर कारंडे, श्रेया बुगडे, भारत गणेशपुरे या टीमने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळीच छाप पाडली आहे. मराठीतच नाही तर बॉलिवूडमध्ये ‘चला हवा येऊ द्या’ची हवा आहे. आमिर खान, शाहरुख खान, विद्या बालन, जॉन अब्राहम, सोनाक्षी सिन्हा या बॉलिवूड कलाकारांनीही ‘चला हवा येऊ द्या’च्या मंचावर हजेरी लावली आहे.

‘चला हवा येऊ द्या’चे हे दौरे नेहमीच प्रेक्षकांच्या मनात घर करुन राहतील यात शंका नाही. निलेश साबळेने स्वत: आता थोडं थांबण्याची वेळ आली आहे, ही विश्रांती मात्र काही वेळासाठीच असल्याचेही त्याने म्हटले आहे. आजचा दिवस चला हवा येऊ द्याच्या प्रेक्षकांसाठी शेवटचा दिवस असणार आहे.