Champions league लिव्हरपूल भिडणार बार्सिलोनाला

4

सामना ऑनलाईन,पोर्टो

उपांत्यपूर्व फेरीच्या पहिल्या लेगमध्ये 2-0 अशा फरकाने विजय मिळवणाऱ्या लिव्हरपूल फुटबॉल क्लबने बुधवारी मध्यरात्री पोर्टोचा 4-1 अशा फरकाने धुव्वा उडवला आणि चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धेत उपांत्य फेरीत धडक मारली. आता त्यांच्यासमोर लियोनेल मेस्सीच्या बार्सिलोनाचे आव्हान असणार आहे. दरम्यान, अन्य लढतीत टोटेनहॅम हॉटस्पर संघाने ‘अवे’ सरस गोल फरकाच्या जोरावर मँचेस्टर सिटीला पराभूत केले आणि उपांत्य फेरीत धडक मारली. टोटेनहॅम हॉटस्पर-एजॅक्स यांच्यामध्ये अन्य उपांत्य फेरीची लढत रंगेल.

लिव्हरपूल-पोर्टो यांच्यामधील लढतीत लिव्हरपूलचेच वर्चस्व दिसून आले. सादियो मेनने 26 व्या मिनिटाला गोल करीत लिव्हरपूलला पूर्वार्धात 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर उत्तरार्धात मोहम्मद सलाहने 65व्या मिनिटाला, रोबर्टो फर्मिनोने 77 व्या मिनिटाला आणि वर्जिल वॅनने 84 व्या मिनिटाला गोल करीत लिव्हरपूलच्या दमदार विजयावर शिक्कामोर्तब केला.

जिंकल्यानंतरही स्पर्धेबाहेर

मँचेस्टर सिटीने उपांत्यपूर्व फेरीच्या दुसऱ्या लेगमध्ये टोटेनहॅम हॉटस्परवर 4-3 अशा फरकाने विजय मिळवला पण चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धेतील त्यांचे आव्हान संपुष्टात आले. कारण पहिल्या लेगच्या लढतीत टोटेनहॅम हॉटस्परने 1-0 अशा फरकाने विजय मिळवला होता. तसेच दोन्ही लेगच्या निकालानंतर 4-4 अशी बरोबरी झाली होती. सरस ‘अवे’ गोलच्या आधारावर टोटेनहॅम हॉटस्परने आगेकूच केली.

उपांत्य फेरीच्या लढती

  • टोटेनहॅम हॉटस्पर – एजॅक्स
  • बार्सिलोना – लिव्हरपूर