चंद्राबाबू नायडू यांनी पुन्हा घेतली राहुल गांधी आणि शरद पवारांची भेट

10

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

निवडणुकीच्या निकालांपूर्वी महाआघाडीच्या नेत्यांच्या भेटीगाठींना वेग आला आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी पुन्हा एकदा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. गेल्या 24 तासांत चंद्राबाबू यांनी दुसऱ्यांदा या नेत्यांची भेट घेतली आहे. रविवारी संध्याकाळी चंद्राबाबू युपिए अध्यक्षा सोनिया गांधी यांनाही भेटणार आहेत. निवडणुकीनंतर कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नाही तर भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी तिसऱ्या आघाडीचे सरकार स्थापन करण्यासाठी आणि पुढील रणनीतीबाबत या नेत्यांमध्ये चर्चा होत आहेत.

लोकसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्यातील मतदान सुरू असतानात नवी दिल्लीत महाआघाडीच्या नेत्यांच्या भोटीगाठी वाढल्या आहेत. निवडणूक निकालनंतरच्या परिस्थितीबाबत या नेत्यांमध्ये चर्चा होत आहे. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी महाआघाडीचे नेते रणनीती आखत आहेत. चंद्राबाबू यांनी शनिवारी राहुल गांधी, शरद पवार, मायावती आणि अखिलेश यादव यांना भेटले होते. तसेच शुक्रवारी त्यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचीही भेट घेतली होती. कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नाही तर भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी प्रादेशिक पक्षांच्या मदतीने सरकार स्थापनेसाठी महाआघाडीची रणनीती ठरवण्यात येत आहे.

सर्वच पक्षांना 23 मे रोजी होणाऱ्या निवडणूक निकालांची उत्सुकता आहे. निवडणुकीचे निकाल आल्यानंतरच परिस्थिती स्पष्ट होईल. त्यानंतरच महाआघाडीबाबत कोणतेही मत व्यक्त करता येईल असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेस पंतप्रदानपदाचा त्याग करू शकते, असे वक्तव्य काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी केले होते. मात्र, 24 तासातच त्यांनी या विधानापासून घुमजाव केले. त्यामुळे भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी महाआघाडीतील नेत्यांचे बैठकींचे सत्र सुरू झाले आहे. भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले नाही तर संभाव्य महाआघाडीबाबत चर्चा करण्यासाठी युपिए अध्यक्षा सोनिया गांधी यांनी 23 मे रोजी 21 पक्षांची बैठक बोलावली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या