कर्ज घेणाऱ्याच्या बायकोला सावकाराने जाळून ठार मारले, मुलाची मृत्यूशी झुंज सुरूच

2

सामना ऑनलाईन, चंद्रपूर

सावकाराने लावलेल्या आगीत गंभीररित्या भाजलेल्या महिलेचा अखेर नागपुरातील मेयो रुग्णालयात मृत्यू झाला. या महिलेला आणि तिच्या मुलाला जसबिरसिंग उर्फ सोनू भाटिया नावाच्या सावकाराने जाळले होते. पेशाने शिक्षक असलेल्या हरिश्चंद्र हरीणखेडे यांनी भाटीयाकडून 3 लाख रुपयांचे कर्ज घेतले होते, ज्यातील 2 लाख रुपयांची त्यांनी परतफेड केली होती. 7 मे रोजी भाटीया याने हरीणखेडे यांच्या घरी जाऊन पैसे मागायला सुरुवात केली. हरीणखेडे यांनी त्यावेळी पैसे नसल्याने सांगितल्याने तो भडकला होता.

गेल्या सोमवारी म्हणजेच 6 तारखेला भाटीयाने हरीणखेडेंना गाठून पैशाची मागणी केली होती. यावेळी त्यांनी मंगळवारी 60 हजार रूपये देण्याचं हरीणखेडेंनी भाटीयाला सांगितलं होतं. भाटीया हरीणखेडेंच्या घरी गेला तेव्हा हरीणखेडेंनी सध्या त्यांच्याकडे पैसे नसून नंतर त्याची परतफेड करतो असं सांगितलं होतं यामुळे भडकलेल्या भाटीयाने हरीणखेडेंचा मुलगा पियूष (26 वर्ष) आणि बायको कल्पना (54 वर्ष) यांच्या अंगावर पेट्रोल फेकलं आणि आग लावली. या आगीमध्ये दोघेजण होरपळले होते. कल्पना या 60 टक्के भाजल्या होत्या तर पियूष हा 40 टक्के भाजला होता.

कल्पना आणि पियूष या दोघांना नागपुरातील मेयो रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. मंगळवारी सकाळी कल्पना यांचा अखेर मृत्यू झाला. एक आठवडा त्यांची मृत्यूशी झुंज सुरू होती. पियूष अजूनही अत्यवस्थ असून ते देखील मृत्यूशी झगडतोय. या दोघांना पेटवण्याच्या नादात भाटीया हा स्वत:देखील भाजला आहे.  त्याच्यावर नागपुरातीलच खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कल्पना यांच्या मृत्यूची बातमी चंद्रपुरात वाऱ्यासारखी पसरली आहे. त्यांच्या मृत्यूनंतर शहरातील अवैधरित्या सावकारी करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करावी व आरोपीवर 302 नुसार खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपीला कडक शिक्षा द्यावी अशी मागणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे यांची केली आहे.