वैद्यकीय साहित्यावरील छापील माहितीत खाडाखोड, मुंबईतील ७ बड्या रुग्णालयांवर कारवाई

सामना ऑनलाईन । मुंबई

रुग्णालयांमध्ये वापरण्यात येणाऱ्या बलून डिव्हाईस, अँजोग्राफिक कॅथेटर, आयव्ही कॅथेटर यासारखी पॅकबंद उपकरणे व वस्तूंवर घोषित केलेली किमत आणि त्यावरील छापील माहितीमध्ये खाडाखोड करून रुग्णांची फसवणूक केल्याप्रकरणी मुंबईतील सात बड्या रुग्णालयांवर सरकारच्या वैध मापन शास्त्र यंत्रणेने कारवाई केली आहे. वैध मापन शास्त्र यंत्रणेचे नियंत्रक तथा विशेष पोलीस महासंचालक अमिताभ गुप्ता यांनी आज सोमवारी ही माहिती दिली.

वैद्यकीय रुग्णालयांमध्ये वापरण्यात येणाऱ्या वस्तूंवर वैध मापन शास्त्र अधिनियमानुसार माहिती न छापणे व अशा वस्तूंची छापील किमतीपेक्षा जास्त किमतीने विक्री करणाऱ्यांविरुद्ध अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री गिरीष बापट यांनी कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानंतर अमिताभ गुप्ता यांनी विशेष मोहिम राबवून मुंबईतील बांद्रा येथील लीलावती हॉस्पिटल व एशियन हार्ट इन्स्टिट्यूट, मुलुंडमधील फोर्टिज हॉस्पिटल, अंधेरीतील कोकीलाबेन धीरुबाई अंबानी हॉस्पिटल, परळमधील ग्लोबल हॉस्पिटल, पवईतील हिरानंदांनी हॉस्पिटल व सर एच.एन. हॉस्पिटल (रिलायन्स फाऊंडेशन) या रुग्णालयांची तपासणी केली.

या कारवाईमध्ये रुग्णांसाठी वापरण्यात येणाऱ्या बलून डिव्हाईस, अँजोग्राफिक कॅथेटर, युरेटिक युरोवर्ल्ड, फॅब्रिक नॅचरल फायबर, आयवी कॅथेटर, गाईड वायर, ब्रेथिक सर्किट, लिंबो सिंगललिम अनेथेसिया, हॅनसन ग्लोज, ब्लड कलेक्टर आदी पॅकबंद वस्तूंवर वैधमापन शास्त्र अधिनियमानुसार माहिती छापली नसल्याचे आढळून आले. याखेरीज रुग्णालयांमधील वजनमापांची पडताळणी व मुद्रांकन न केल्याप्रकरणी या रुग्णालयांवर कारवाई करण्यात आली आहे.

वैद्यकीय क्षेत्रात वापरण्यात येणाऱ्या पॅकबंद साहित्यांवर घोषित किमत व रुग्णालय व्यवस्थापनाद्वारे रुग्णांकडून आकारण्यात येणाऱ्या दरातील तफावतीसंबंधीची तपासणी वैध मापन शास्त्र यंत्रणेकडून करण्यात येत आहे. छापील किंमतीपेक्षा जास्त दर आकारून रुग्णांची फसवणूक करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात येत असून ग्राहकांनी अशा प्रकाराविरुद्ध जागरुक रहावे, असे आवाहन अमिताभ गुप्ता यांनी नागरिकांना केले आहे.

दरम्यान, बाबत काही तक्रार असल्यास  वैध मापन यंत्रणेच्या नियंत्रण कक्षाचा दुरध्वनी क्र. (022-22886666) किंवा ई-मेल[email protected]  किंवा [email protected]com, [email protected],dycl[email protected], [email protected]ahoo.com, [email protected],d[email protected], dyclm[email protected], dyclmnagpur@yahoo.in या ईमेल पत्त्यावर तक्रारी नोंदवाव्यात, असे आवाहन गुप्ता यांनी  केले आहे.