चंगेज मुलतानींचे नगरसेवक पद रद्द

सामना ऑनलाईन । मुंबई

जोगेश्वरीतील प्रभाग क्रमांक ६२ चे नगरसेवक चंगेज मुलतानी यांचे नगरसेवक पद रद्द करण्यात आले आहे. महापौर प्रिन्सिपल विश्वनाथ महाडेश्वर यांनी आज सभागृहात ही घोषणा केली. प्रभाग क्र. ६२ मधून निवडून आलेले अपक्ष नगरसेवक चंगेज मुलतानी यांचे जात प्रमाणपत्र बोगस आढळले होते. चंगेज मुलतानी यांनी शिवसेनेला पाठिंबा दिला होता.

फेब्रुवारीमध्ये झालेल्या महानगरपालिका निवडणुकीत निवडून आलेल्या चंगेज मुलतानी यांनी नगरसेवक पद आज अखेर बाद झाले. जात पडताळणी समितीने त्यांचे जात प्रमाणपत्र बाद ठरवले होते. लघुवाद न्यायालयाच्या निकालानुसार आज सभागृहात अधिकृत घोषणा करण्यात आली. आता या रिक्त झालेल्या पदावर दुसऱ्या क्रमांकाचे उमेदवार शिवसेनेचे राजू पेडणेकर हे नगरसेवक म्हणून निवडून येण्याची शक्यता आहे. लघुवाद न्यायालयात याप्रकरणी सुनावणी सुरू असून पुढील निकालाकडे आता सगळ्य़ांचे लक्ष लागले आहे.

सहा नगरसेवक जात पडताळणीत बाद
फेब्रुवारीमध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत निवडून आलेल्या २२७ नगरसेवकांपैकी ६ नगरसेवकांचे जात प्रमाणपत्र जात पडताळणी समितीने अवैध ठरवले होते. त्यामुळे त्यांचे नगरसेवक पद धोक्यात आहे. यामध्ये काँग्रेसचे २, भाजपचे ३ आणि अपक्ष १ अशा एकूण सहा नगरसेवकांचा समावेश आहे. मात्र या नगरसेवकांच्या पदाबाबत अद्याप न्यायालयाने निकाल दिलेला नाही.

यांचे पद धोक्यात
प्रभाग क्र. ९० – काँग्रेसच्या टय़ुलिप मिरांडा
प्रभाग क्र. २८ – काँग्रेस रामपती यादव
प्रभाग क्र. ८१ – भाजपचे मुरजी पटेल
प्रभाग क्र. ७६ – भाजपच्या केशरीबेन पटेल
प्रभाग क्र. ७२ – भाजपचे पंकज यादव

शिवसेनेच्या नगरसेवकांची संख्या वाढणार?
चंगेज मुलतानी हे अपक्ष होते व त्यांनी शिवसेनेला पाठिंबा दिला होता. सभागृहात सध्या शिवसेनेचे ८४ आणि ४ अपक्ष असे मिळून 88 जणांचे संख्याबळ आहे. मात्र राजू पेडणेकर यांना नगरसेवक पद मिळाल्यास शिवसेनेचे संख्याबळ तेवढेच असले तरी शिवसेनेचे ८५ नगरसेवक होतील.