105 बसेसच्या दुरुस्तीवरून विरोधकांचा थयथयाट, शिवसेना नगरसेवकांचा मूँहतोड जवाब

1

सामना प्रतिनिधी । ठाणे

टीएमटीच्या 105 बसदुरुस्तीवरून शनिवारी ठाणे महानगरपालिकेच्या महासभेत प्रचंड गदारोळ उडाला. सत्ताधारी शिवसेनेवर आरोपांच्या फैरी झाडून भाजप व राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी थयथयाट केला. मात्र शिवसेनेच्या नगरसेवकांनी मूँहतोड जवाब देत आरोपांच्या चिंधड्या उडवल्या. या बसेस दुरुस्त झाल्या तर ठाणेकर प्रवाशांची मोठी सोय होणार आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी आरोप-प्रत्यारोप करत गोंधळ घातल्याने सभागृहाचे वातावरण तणावपूर्ण झाले. घोषणाबाजी तसेच कागद भिरकावणाऱ्या भाजप, राष्ट्रवादीच्या नगरसेवकांचे ‘स्टेअरिंग’ भरकटल्याचे चित्र दिसून आले. अखेर सर्व आरोपांवर मात करत बसेसच्या दुरुस्तीसह सर्व प्रस्ताव गोंधळातच मंजूर झाले.

विविध आगारांमध्ये नादुरुस्त असलेल्या 105 बसेसची दुरुस्ती करण्यासाठी 8 कोटी 85 लाख रुपये एवढा खर्च येणार आहे. या बसेस दुरुस्त करून त्या जीसीसी (ग्रॉस कॉस्ट कॉण्ट्रक्ट) तत्त्वावर चालवण्याचा प्रस्ताव आज महासभेत प्रशासनाच्या वतीने मंजुरीसाठी मांडण्यात आला होता. प्रशासनाच्या कामात सत्ताधारी खो घालत असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे नगरसेवक नजीब मुल्ला यांनी केला. भाजपच्या नगरसेवकांनीही आरोप करण्यास सुरुवात केली. त्यावर सभागृहनेते नरेश म्हस्के यांनी हा आरोप सपशेल फेटाळत प्रशासनानेच खुलासा करावा अशी मागणी केली.

  • परिवहनचे व्यवस्थापक संदीप माळवी यांनी कोणताही राजकीय हस्तक्षेप किंवा दबाव नसून सर्वसामान्य ठाणेकरांसाठी जास्तीत जास्त बसेस उपलब्ध व्हावेत यासाठीच हा प्रस्ताव प्रशासनाने आणला असल्याचे स्पष्ट केले.
  • राष्ट्रवादी व भाजप नगरसेवकांचा गोंधळ सुरूच होता. शिवसेनेवर केलेले आरोप कदापि सहन केले जाणार नाही, असा इशारा नरेश म्हस्के यांच्यासह स्थायी समितीचे सभापती राम रेपाळे, अशोक वैती आदींनी दिला. या गदारोळात भाजप व राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची ‘आघाडी’ झाल्याचे दिसून आले.
  • संदीप लेले, नजीब मुल्ला यांच्यासह भाजप-राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी आयुक्त संजीव जयस्वाल व महापौर मीनाक्षी शिंदे यांच्या आसनासमोर जाऊन बसकण मांडली आणि घोषणाबाजी केली. या गोंधळातच बसेस दुरुस्तीच्या प्रस्तावासह सर्व प्रस्ताव मंजूर झाल्याची घोषणा सचिव अशोक बुरपुल्ले यांनी केली.

… तर आम्हालाही विचार करावा लागेल
राष्ट्रवादीचे नगरसेवक नजीब मुल्ला हे वारंवार सत्ताधाऱ्याचा प्रशासनावर दबाव आहे, तसेच खो घालण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे सांगत होते. विषयाला धरून न बोलता त्यांचे स्टेअरिंग भरकटत असल्याचे बघून महापौर मीनाक्षी शिंदे यांनीही त्यांना सुनावले. त्या म्हणाल्या, प्रत्येक वेळी सत्ताधाऱ्यांवर आरोप करणे चुकीचे आहे. असाच प्रकार सुरू राहिला तर आम्हालाही विचार करावा लागेल. – मीनाक्षी शिंदे, महापौर.

आरोप खपवून घेणार नाही
पुराव्याअभावी केलेले आरोप आम्ही खपवून घेणार नाही. ठाणेकर जनतेने आम्हाला प्रस्ताव मंजूर करायचा की नाही हे ठरविण्याचे अधिकार दिले आहेत. गेली 25 वर्षे ठाणेकरांचा आमच्यावर विश्वास आहे असे सभागृहनेते नरेश म्हस्के यांनी भाजप व राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना ठणकावून सांगितले. – नरेश म्हस्के, सभागृह नेते.