घरच्या घरी बनवा चपाती नूडल्स

सामना ऑनलाईन। मुंबई

हल्ली हॉटेलमध्ये, नाक्यावर, अगदी घराजवळच्या गल्लीतही चायनीज फूड मिळू लागलय. सहज उपलब्ध होणार व कमी वेळात तयार होणार चायनीज तब्येतीसाठी मात्र घातक आहे. चायनीज पदार्थांची चव वाढावी म्हणून यात अजीनो मोटो नावाची पावडर टाकली जाते. ज्यामुळे हाडांची झीज वेगाने होते. म्हणूनच काहीजण घरच्या घरी चायनीज बनवण पसंत करतात. पण याचदरम्यान सध्या हिंदुस्थानी स्टाईलने चायनीज बनवण्याच फॅडही वाढू लागलय. यात चपातीच्या नूडल्स जास्त लोकप्रिय झाल्या आहेत. नाश्ता किंवा मुलांना शाळेच्या डब्यातही या नूडल्स देऊ शकता.

साहीत्य…चार चपात्या,(शिळ्या किंवा ताज्या) २०० ग्रॅम कोबी, एक कांद्याची पात, एक ते दिड हिरवी व पिवळी सिमला मिरची, एक मोठा कांदा, एक चमचा आलं लसूण पेस्ट, २ चमचे सोया सॉस, २ चमचे चिली सॉस, मीठ चवीनुसार, दोन मोठे चमचे तेल.

chapati-roll

कृती…सर्वप्रथम चपात्या एकावर एक याप्रमाणे ठेवाव्यात. नंतर त्या रोल कराव्यात. चाकूने त्याचे गोल पातळ काप करावेत. एका कढईत एक चमचा तेल घ्यावे. तेल गरम झाल्यावर त्यात चपातीच्या नूडल्स पसरून टाकाव्यात. मिडियम गॅसवर त्या लालसर होईपर्यंत परताव्यात. नंतर एका ताटात त्या ठेवाव्यात. पुन्हा कढई गॅसवर ठेवावी. त्यात उरलेलं तेल ओताव . तेल गरम होताच त्यावर सर्वभाज्या एक एक करुन परतून घ्याव्यात. नंतर मंद आचेवर त्यांच्यात आलं लसूण पेस्ट, सोया सॉस, चिली सॉस, मीठ टाकावे. सर्व मिश्रण एकत्र परतून घ्यावे. त्यावर चपातीच्या नूडल्स टाकाव्यात. गॅस फास्ट करावा. दोन मिनिट पुन्हा एकदा सगळे मिश्रण खालीवर करत परतून घ्यावे. गॅस बंद करावा. गरमा गरम चपाती नूडल्स तयार.