निवडणुकीपुरता तोंड दाखवणाऱ्या आमदारावर चपला फेकल्या

सामना ऑनलाईन, बंगळुरू

कर्नाटकमध्ये निवडणुका जवळ आल्या असून तिथले संभाव्य उमेदवार भेटीगाठी घेण्यासाठी धडपड करायला लागले आहे. मात्र भेटीगाठी घेताना काहबी विद्यमान आमदारांच्या पोटात गोळा आला आहे. कारण हे आमदार असे आहेत जे निवडून आल्यानंतर मतदारसंघात जातच नाहीत. जनता दल सेक्युलरचे आमदार इक्बाल अन्सारी हे अशातलेच एक आमदार आहेत. गंगावती भागामध्ये ते प्रचारसभेसाठी रस्त्यावर उतरले होते. यावेळी भडकलेल्या मतदारांनी अन्सारी यांच्यावर चपला फेकून मारल्या.

गंगावती भागातील मतदारांनी या चप्पलफेकीबाबत बोलताना सांगितलं की ५ वर्षांपूर्वी जेव्हा अन्सारी निवडून आले होते तेव्हा त्यांनी या भागात शौचालय बांधू असं आश्वासन दिलं होतं. पाण्याची समस्याही दूर करू असं आश्वासन त्यांनी दिलं मात्र निवडून आल्यावर या समस्या सोडवणं तर दूरच राहिलं त्यांनी मतदारांना परत तोंडही दाखवलं नाही. यामुळे भागातील जनता अन्सारी यांच्यावर वैतागली होती. पुन्हा मत मागायला आल्यास अन्सारींना धडा शिकवायचा असं मतदारांनी ठरवलं होतं, आणि जेव्हा ते समोर दिसले तेव्हा त्यांना चपला फेकून मारण्यात आल्या.

या भागातील महिलांचं म्हणणं आहे की उघड्यावर शौचाला जायला आम्हाला लाज वाटते. उघड्यावर प्रातर्विधी केले जात असल्याने या भागात प्रचंड दुर्गंधी पसरली आहे. काही लोकांनी एकत्र येऊन शौचाची जागा साफ करण्याचा प्रयत्न केला, मात्र हे किती दिवस चालणार ? असं इथल्या महिलांनी विचारलं आहे. ही घटना ऐकल्यानंतर निवडून आलेल्या मात्र मतदारांना एकदाही तोंड न दाखवणाऱ्यांच्या मना धडकी भरली आहे.