चर्चगेट-डहाणू लेडीज स्पेशल लोकल हवी

सामना प्रतिनिधी । मुंबई

पश्चिम रेल्वे मार्गावरील चर्चगेट ते डहाणू स्थानकादरम्यान लेडीज स्पेशल लोकल चालविण्यात यावी या मागणीसंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. याबाबत महिनाभरात रेल्वे प्रशासनाकडे प्रस्ताव सादर करा असे निर्देश हायकोर्टाने गुरुवारी दिले. पश्चिम रेल्वे मार्गावर चर्चगेट ते डहाणूदरम्यान लोकल सुरू करण्यात आली असली तरी डहाणूपर्यंत एकही महिलांकरिता विशेष लोकल धावत नाही. त्यामुळे डहाणूहून मुंबईत येणाऱ्या महिलांना नेहमीच गर्दीचा सामना करावा लागतो.

महिलांच्या सोईकरिता राजकुमार चोरगे यांनी चर्चगेट ते डहाणू लेडीज स्पेशल लोकल सुरू करण्यात यावी अशी मागणी याचिकेद्वारे मुंबई उच्च न्यायालयात केली आहे. त्यासंदर्भात आज मुख्य न्यायमूर्ती मंजुळा चेल्लूर आणि न्यायमूर्ती एन. एम. जामदार यांच्या खंडपीठाने सुनावणी देतेवेळी महिनाभरात पश्चिम रेल्वे व केंद्र शासनाकडे प्रस्ताव सादर करावा, असे आदेश दिले.