पुन्हा धस्स झालं… चर्नी रोडच्या पादचारी पुलाच्या पायऱ्या कोसळल्या

सामना ऑनलाईन, मुंबई

एल्फिन्स्टन येथील पुलावर चेंगराचेंगरीत २३ जणांचा बळी गेल्याची घटना ताजी असतानाच शनिवारी सायंकाळी पुन्हा एकदा काळजात धस्स झालं. चर्नी रोड येथील पादचारी पुलाच्या काही पायऱया अचानक कोसळल्या. या दुर्घटनेत दोघे किरकोळ जखमी झाले. गर्दी नसल्याने सुदैवानी मोठी जीवितहानी टळली.

एल्फिन्स्टन येथील दुर्घटनेनंतर रेल्वे स्थानकांतील पुलांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. त्यातच चर्नी रोड येथील बाबासाहेब जयकर मार्गावरील पादचारी पुलाचा काही भाग शनिवारी रात्री साडेआठच्या सुमारास कोसळला. दोन पादचारी जिना चढत असतानाच जिन्याच्या काही पायऱ्या कोसळल्या आणि दोघे जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच शिवसेना विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ यांच्यासह शिवसैनिकांनी घटनास्थळी धाव घेतली. याबाबत माहिती मिळताच महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनीदेखील घटनास्थळी जाऊन पाहणी केली.

चर्नी रोडचा हा पादचारी पूल पालिकेच्या अखत्यारीत येतो. तो नवीन बांधण्यासाठी टेंडर मंजूर झाले आहे; मात्र रेल्वेच्या काही तांत्रिक अडचणींमुळे या पुलाचे बांधकाम अद्याप सुरू झाले नाही. घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर महापौरांनी पालिका अधिकारी आणि रेल्वे प्रशासन यांची तातडीची बैठक बोलावून यावर तोडगा काढण्याच्या सूचना दिल्याचे पांडुरंग सकपाळ यांनी सांगितले.

दुपारीच केली होती पाहणी
हा पादचारी पूल धोकादायक स्थितीत असल्याने खासदार अरविंद सावंत, विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ यांनी पालिका अधिकाऱ्यांसह शनिवारी दुपारीच पुलाची पाहणी केली होती. यावेळी माजी नगरसेवक संपत ठाकूर, उपविभागप्रमुख शिवाजी राहणे, छोटू देसाई, शाखाप्रमुख गजानन भोसले, दीपन मोघे, बाळा अहिरेकर यांच्यासह गिरगावकर उपस्थित होते.