वाळूमाफियांकडून तहसीलदारांचा पाठलाग

सामना प्रतिनिधी । कवठे येमाई

शिरूरचे तहसीलदार रणजित भोसले हे त्यांचे कार्यालयीन कामकाज उरकून त्यांच्या खासगी वाहनाने प्रवास करत असताना एक इनोव्हा कार त्यांचा खूप वेळ पाठलाग करत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनतर पाठलाग करणाऱ्या वाहनास अडविण्याचा प्रयत्न केला असता संबंधितांनी तेथून पळ काढला. ही घटना रविवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास नगर-पुणे महामार्गावर शिरूर ते कोरेगाव भीमा दरम्यान घडली. याप्रकरणी तहसीलदार भोसले यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात वाळूमाफियांकडून पाठलाग केल्याची तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

तहसीलदार रणजित भोसले हे रविवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या दरम्यान शिरूर तहसीलदार कार्यालयातील कामकाज आटोपून नगर-पुणे महामार्गाने कोरेगाव भीमाकडे निघाले होते. महामार्गावर त्यांच्या वाहनाचा एक इनोव्हा कार पाठलाग करत असल्याचे भोसले यांच्या निदर्शनास आले. त्यांनतर कोरेगाव भीमा येथे आल्यानंतर अपर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार तहसीलदार भोसले हे कोरेगाव भीमा येथून शिरसगाव काटा येथे जाण्यासाठी पुन्हा शिरूरच्या दिशेने जाण्यासाठी निघाले. यावेळीही तीच इनोव्हा पुन्हा भोसलेंच्या वाहनाचा पाठलाग करत असल्याचे दिसून आले.

भोसले यांना संशय आल्याने त्यांनी सणसवाडी येथे आल्यानंतर स्वत:चे वाहन एका पेट्रोलपंपामध्ये घातले असता पाठलाग करणारी इनोव्हा कारही पाठोपाठ पेट्रोलपंपामध्ये आली. त्यानंतर भोसलेंनी त्यांचे वाहन पेट्रोलपंपातून बाहेर काढून पुन्हा पेट्रोलपंपामध्ये घेतले असता पाठलाग करणारी इनोव्हा कारही पुन्हा पेट्रोलपंपाच्या बाहेर पडून पुन्हा आतमध्ये आली. त्यावेळी तहसीलदार भोसले यांनी त्यांच्या वाहनातून उतरून पाठलाग करणाऱ्या इनोव्हा कारच्या दिशेने धाव घेतली असता इनोव्हा कारचालकाने तेथून कारसह पळ काढला.

याबाबत तहसीलदार भोसले यांनी रात्री १० वाजण्याच्या सुमारास शिक्रापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पाठलाग करणारी इनोव्हा कार वाळूमाफियांपैकी कोणा एकाची असून, त्याला वाळूवाहतूक करणे सोयीचे जावे यासाठी तो माझ्यावर पाळत ठेवत असल्याचे भोसले यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. पुढील तपास शिक्रापूर पोलीस करत आहेत.

वाळूमाफियांवर प्रशासनाने सुरु केलेल्या कडक कारवाईनंतर आता उद्दाम माफियांनी थेट तहसीलदार आणि सरकारी यंत्रणेला लक्ष करण्यास सुरुवात केल्याचे या घटनेवरुन दिसून येत आहे.