मसालेदार

मीना आंबेरकर

‘चाट’ म्हटले की आपल्या तोंडाला पाणी सुटते. चाट या प्रकाराची लज्जत वाढवणारा असा हा ‘चाट मसाला.’

चाट मसाला

एक फार साधा सोपा असा मसाल्याचा प्रकार. हा मसाला करण्यासाठी फारसे कष्ट घ्यावे लागत नाही किंवा पदार्थांच्या प्रमाणातही फारसा काटेकोरपणा बाळगावा लागत नाही. परंतु आपल्या रसनेची चव मात्र त्यातील चटकदारपणामुळे वाढते. रोजच्या जेवणातील एखाद्या पदार्थाची चव व स्वाद वाढविण्यासाठी या मसाल्याची चिमूट उपयुक्त ठरते. या मसाल्याचे नाव आहे चाट मसाला. तसे म्हटले तर ‘चाट’ म्हटले की आपल्या तोंडाला पाणी सुटते. ‘चाट’ आवडत नाही, असे म्हणणारी व्यक्ती क्वचितच आढळते. लहानांपासून थोरांपर्यंत सगळय़ानाच चाट अतिशय प्रिय आहे. चाट या प्रकाराची लज्जत वाढवणारा असा हा ‘चाट मसाला.’ प्रथम आपण या चाट मसाल्याचे साहित्य व कृती पाहू.

साहित्य…अर्धा चमचा हिंगाची पूड, दोन चमचे पादेलोण, एक चमचा पुदिना पूड, चार चमचे भाजून घेतलेल्या जिऱयाची पूड, सात-आठ चमचे आमचूर, दोन चमचे तिखट, एक चमचा मिरी पूड, तीन चमचे मीठ.

कृती…हिंगाची पूड भाजून घ्यावी. वरील सर्व जिन्नस एकत्र करून चांगले मिसळावेत.

चाट मसाला हा वेगवेगळय़ा सॅलडचीही लज्जत वाढवतो. सॅलडमध्ये हा मसाला प्रामुख्याने वापरला जातो. हा मसाला वापरून केलेल्या काही खाद्यकृती आपण पाहूया.

koshmbir

मिश्र कोशिंबीर

साहित्य…एक छोटे बीट, दोन मध्यम आकाराचे बटाटे, एक गाजर, दोन पिकलेली केळी, एक टोमॅटो, एक काकडी, चार हिरव्या मिरच्या, एक कांदा, दोन वाटय़ा गोड दही, पाव चमचा किसलेले आले, कोथिंबीर, मीठ, साखर चवीनुसार, एक चमचा चाट मसाला.

कृती…बीट व गाजर वाफवून घ्यावे. केळय़ाचे लहान तुकडे करावेत. कांदा बारीक चिरून घ्यावा. बीट गाजर व टोमॅटो चिरून घ्यावेत. काकडी कोचून घ्यावी. मिरच्या व कोथिंबीर चिरून घ्यावी. सर्व भाज्या एकत्र करून वर दही, मीठ, साखर व चाट मसाला एकसारखे करावे. ही कोशिंबीर रंगाने छान दिसते व लागतेही चवदार.

puri-chat

चटपटीत चाट

पापडी चाट (पालकची)

साहित्य…पापडीसाठी पालकची १०-१२ पाने मोठी असल्यास कापून तुकडे करा, अर्धी वाटी डाळीचे पीठ, मीठ, साखर, हळद, तिखट चवीप्रमाणे, तळायला तेल, चिमूटभर सोडा, अर्धा चमचा चाट मसाला.

चाटसाठी – एक उकडलेला बटाटा, थोडी शेव, अर्धी वाटी दही घुसळून, कोथिंबीर चिरून, थोडे तिखट, अर्धा चमचा चाट मसाला, तीन चमचे आमचूर पावडर, अर्धी वाटी गरम पाणी, अर्धी वाटी गूळ, एक कांदा बारीक चिरून.

कृती …डाळीच्या पिठात मीठ, तिखट, हळद, पाणी घालून भज्यांच्या पिठाइतपत पातळ पीठ भिजवावे. सोडा घालून फेटावे. त्यात पालकची पाने बुडवून भजी तळावीत. कांदा बारीक चिरावा. बटाटा कुस्करून घ्यावा. त्यात मीठ, साखर घालावी. गरम पाण्यात गूळ विरघळावा. त्यात चिमूटनभर मीठ व आमचूर पावडर घालावी. म्हणजे आंबट, गोड चटणी तयार होईल. तळलेल्या पालक पापडय़ांवर कांदा, बटाटा मिश्रण घालावे. चाट मसाला, तिखट, मीठ भुरंभुरावे. दही घालावे. त्यावर गोड चटणी घालावी व कोथिंबीर शेव घालून सर्व्ह करावी.

dahi-chat

दहीवाली पकोडी

साहित्य…एक वाटी बेसन, एक टे. स्पून तांदूळपिठी, कांदा, हिरवी मिरची, कोथिंबीर, मीठ चिमूटभर, खायचा सोडा, धणे-जिरे पूड, तेल.

दही, मिरची, कोथिंबीर, चाट मसाला, साखर, मीठ, चवीनुसार चिंचेची चटणी.

कृती…मिरची, कोथिंबीर, कांदा हे सर्व बारीक कापून घ्यावे. तांदळाचे पीठ व बेसन एकत्र करून त्यात सोडा व मीठ घालून त्यात कांदा, मिरची, कोंथिबीर घालून धणे-जिरे पूड घालून एकत्र करावे. वर एक टेबल स्पून तेल कडकडीत करून चिमूटभर सोडा घालून पिठावर घालावे. पाण्याने पीठ भिजवून तयार करावे. चमच्यातून पडेल इतपत घट्ट असावे. कढईत तेल तापवून त्यात चमच्याने थोडे थोडे पीठ घालून लहान लहान पकोडी तळून काढावीत. पकोडी तेल निथळून कोरडी झाली की एका डिशमध्ये ठेवून वर मीठ, साखर घालून घोटलेले दही घालावी. वर मिरची पूड, चाट मसाला घालावा. सर्वात शेवटी चिंचेची चटणी घालून पकोडी सर्व्ह करावे.