छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आपले स्वागत आहे!

सामना ऑनलाईन, मुंबई

मुंबई विमानतळावर गेलात की आता नवी उद्घोषणा ऐकायला मिळणार आहे. केवळ छत्रपती शिवाजी नव्हे तर छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आपले स्वागत आहे अशी ती उद्घोषणा असेल. केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयाने नुकतीच त्याला मंजुरी दिली. शिवसेनेने दिलेल्या दणक्यामुळेच हे शक्य झाले आहे.

छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नामकरण ‘छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ’ असे करावे, विमानतळावर छत्रपतींचा पुतळा पुन्हा उभारावा, पश्चिम द्रुतगती महामार्गालगत  असलेल्या शिवरायांच्या पुतळय़ाजवळ गडकिल्ल्यांची प्रतिकृती उभारावी, पुतळय़ावर मेघडंबरी उभारावी आदी मागण्यांसाठी शिवसेना गेली चार वर्षे जीव्हीके कंपनीकडे पाठपुरावा करत आहे. विमानतळाचा कारभार जीव्हीकेच्या हाती असल्याने त्याची अंमलबजावणी करण्याचा अधिकारही जीव्हीकेला आहे, परंतु शिवसेनेच्या मागण्यांकडे जीव्हीके सातत्याने दुर्लक्ष करत होती. त्यामुळे संतप्त शिवसैनिकांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि विभागप्रमुख-आमदार ऍड. अनिल परब यांच्या नेतृत्वाखाली विभाग संघटक राजुल पटेल, रजनी मेस्त्री भारतीय कामगार सेनेचे संजय कदम आणि शिवसैनिकांनी गेल्या 8 ऑगस्ट रोजी विमानतळावर धडक दिली होती. शिवसेनेच्या खासदारांनीही त्यासाठी पाठपुरावा केला होता. आज केंद्रीय नागरी उड्डाणमंत्री सुरेश प्रभू यांनी मुंबई विमानतळाचे ‘छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ’ असे नामकरण झाल्याचे सांगत महाराष्ट्रातील जनतेचे अभिनंदन केले.