जेएनपीटी शिवस्मारकाचे १७ फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उदघाटन

122

सामना प्रतिनिधी । उरण

जेएनपीटीने जासई-दास्तानफाटा दरम्यान सुरू केलेल्या 30 कोटी खर्चाच्या शिवस्मारकाचे १७ फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उदघाटन होणार आहे. याप्रसंगी केंद्रीय मंत्री नितिन गडकरी, ज्येष्ठ निरुपणकार डॉ. नानासाहेब धर्माधिकारी, संभाजीराजे भोसले, दुर्ग समीतीचे अध्यक्ष, खासदार श्रीरंग बारणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमाला सुमारे सात लाख शिवप्रेमी उपस्थित राहणार असल्याचा दावा जेएनपीटीने मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत केला.

जेएनपीटीने उरण तालुक्यातील जासई-दास्तानफाटा दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थांच्या भेटीवर आधारीत शिवस्मारक उभारण्याचे काम मागील वर्षापासून सुरु केले आहे. सुमारे 30 कोटी खर्चून 22 मीटर उंचीचे हे स्मारक जेएनपीटीच्या मालकीच्या पावणे दोन एकर जागेत उभारण्यात येत आहे. स्मारकाच्या पुतळ्याचे काम थोर शिल्पकार दिपक थोपटे यांनी केले आहे. परिसरात आर्ट गॅलरी, शिवकालीन वस्तुंचे म्युझियम, मिनी एमपी थिएटर, कॅफेटरिया, फाऊंटन गार्डन आदीं सुविधाही उभारण्यात येत आहेत. या स्मारकाचे बांधकाम फेब्रुवारी 2019 मध्ये पुर्ण करण्याची मुदत आहे. मात्र स्मारकाचे काम अपूर्णच असतानाच जेएनपीटीने अपुर्ण अवस्थेतील शिवस्मारकाच्या उद्घाटनाचा घाट घातला आहे. जेएनपीटीने चालविलेल्या उदघाटनाच्या घाईला अनेक राजकीय, सामाजिक संघटनांने विरोध केला आहे. त्यामुळे उदघाटनाच्या कार्यक्रमावरच उलट-सुलट चर्चा सुरु झाली आहे.

या पार्श्र्वभूमीवर आज जेएनपीटीने पत्रकार परिषद घेऊन उदघाटनाची तारीखच जाहीर करून टाकली. यावेळी जेएनपीटी ट्रस्टी महेश बालदी, कामगार ट्रस्टी दिनेश पाटील, रवींद्र पाटील, जेएनपीटी मुख्य प्रबंधक जयवंत ढवळे, एन.के.कुलकर्णी, मार्केटिंग विभागाचे जे. के.म्हात्रे, अंबिका सिंग, अमोल थोरात आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी विरोधकांनी विरोध करावा. मात्र 30 कोटी खर्चाच्या शिवस्मारकाचे १७ फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उदघाटन होणार आहे. याप्रसंगी केंद्रीय मंत्री नितिन गडकरी, ज्येष्ठ निरुपणकार डॉ. नानासाहेब धर्माधिकारी, संभाजीराजे भोसले, दुर्ग समीतीचे अध्यक्ष, खासदार श्रीरंग बारणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमाला सुमारे सात लाख शिवप्रेमी उपस्थित राहणार असल्याचा दावा जेएनपीटीने मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत केला.

यावेळी होऊ घातलेल्या जेएनपीटी सेझच्या कामाची माहितीही देण्यात आली. २ हजार ७७ हेक्टर क्षेत्रात जेएनपीटी सेझची उभारणी केली जात आहे. त्यापैकी ३०.५ हेक्टर क्षेत्रात १६ निवेशकांनी गुंतवणूक केली आहे. जेएनपीटीने निविदा काढून जागा ४८ हजार स्केअर मीटर दराने निवेशकांना भाड्याने दिल्या आहेत. जेएनपीटीच्या या सेझमध्ये सवा लाख रोजगार उपलब्ध होणार आहे. डीपडीमुळे कोणताच परिणाम झालेला नाही. तसेच जेएनपीटीचा व्यवसाय वाढत असल्याचाही दावाही जेएनपीटीने पत्रकार परिषदेत केला.

आपली प्रतिक्रिया द्या