फेसबुकवरून मैत्री करून लाखोंचा गंडा; विवाहित महिलेची पोलिसांत तक्रार

8

सामना प्रतिनिधी । मुंबई

फेसबुकवर मैत्री करून एका भामट्य़ाने जे. जे. मार्ग येथे राहणाऱ्या महिलेला साडेचार लाखांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. कॅन्सरग्रस्तांना मदत करायची आहे असे सांगून तिला फसविण्यात आले असून याप्रकरणी तिच्या तक्रारीवरून जे. जे. मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जे. जे. मार्ग येथील बिस्मिल्ला हाऊस येथे राहणाऱ्या सुमय्या मोमीन यांना फेसबुकवर मॅक्स जोहान्स या नावाने फ्रेंड रिक्वेस्ट आली. कोणतीही शहानिशा न करता सुमय्या यांनी ही रिक्वेस्ट स्वीकारली. दोघांची फेसबुकवर मैत्री झाली. दोघेही एकमेकांशी मेसेंजरवरून बोलू लागले. सुमय्या यांचा आपल्यावर विश्वास बसल्याचे लक्षात येताच मॅक्स याने कॅन्सरवरून बोलण्यास सुरुवात केली. माझ्या पत्नीचे कॅन्सरने निधन झाले त्यामुळे मला कॅन्सरग्रस्तांना मदत करायची आहे. हिंदुस्थानातील गरजूंना मदत पाठवतो तू स्वयंसेवी संस्थाना दे असे मॅक्सने सांगितले. कॅन्सरग्रस्तांना मदत द्यायची आहे म्हणून सुमय्या हिनेही तयारी दर्शवली.

हिंदुस्थानात काही वस्तू पाठविल्याचे मॅक्स याने सुमय्या यांना कळविले. दोनच दिवसांनी त्यांना दिल्ली विमानतळावरून एका महिलेचा फोन आला. विमानतळावरील महिला अधिकारी बोलत असल्याचे सांगून तिने न्यूयॉर्कवरून आपल्या नावाचे पार्सल आल्याचे सुमय्या हिला सांगितले. आयफोन, चॉकलेट, परफ्युम, पेन ड्राइव्ह, डॉलर्स अशा विविध वस्तू पाठविण्यात आल्या आहेत. त्यावर तुम्हाला कर भरावा लागेल असे सांगून टप्प्याटप्प्याने विविध बँक खात्यांत पैसे भरण्यास सांगितले. सुमय्या यांनी सुमारे साडेचार लाख रुपये भरले. इतके पैसे भरूनही एकही वस्तू हाती न लागल्याने फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी याप्रकरणी जे. जे. मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.

कर, दंड आणि सर्टिफिकेट
तुमच्या पार्सलचे वजन १२ किलोपेक्षा जास्त असल्याने तुम्हाला २७ हजार रुपये कर भरावा लागेल. डॉलर्स असल्याने ८० हजार दंड भरावा लागेल. त्यानंतर या वस्तूंची किंमत जास्त होत असल्याने साडेतीन लाख आयकर भरावा लागेल असे विमानतळावरील महिला अधिकाऱ्याने सांगितले. हे सर्व पैसे सुमय्या याने दिल्लीतील विविध खात्यांमध्ये ट्रान्सफर केले. तुम्हाला आलेल्या वस्तू आणि डॉलर्स हे अतिरेकी कारवायांसाठी नाहीत. हे स्पष्ट करण्यासाठी तुम्हाला ऍन्टी टेरेरिझम सर्टिफिकेट मिळेल त्यासाठी पाच लाख रुपये द्या, असे सांगितल्यावर मात्र सुमय्या यांना संशय आला आणि त्यांनी पोलिसांत धाव घेतली.

आपली प्रतिक्रिया द्या