दापोलीतील बर्फ कारखाने तपासणी मोहीम: सरबत आणि गोळा विक्रेत्यांवर लवकरच धाडी

1

सामना प्रतिनिधी । रत्नागिरी

मासे जतन करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या बर्फापासून तयार करण्यात आलेले गोळे खाल्याने ३७ जणांना तापाची लागण झाली, हि घटना उघडकीस येताच अन्न औषध प्रशासनाला जाग आली आहे. या प्रकरणात रत्नागिरीचे पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी झाडाझडती घेतल्यानंतर अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी दापोलीतील बर्फ कारखान्याची तपासणी करण्यासाठी उद्या दिनांक १५ मे चा मुहूर्त निवडला आहे. लवकरच सरबत आणि गोळा विक्रेत्यांवर धाडी पडणार आहेत.

माशांसाठी बनविलेले बर्फ सरबत, गोळा आणि खाद्यपदार्थामध्ये वापरण्याच्या गोष्टी पुढे येत आहेत. दापोलीतील घटनेनंतर अनेकांचे डोळे उघडले आहेत. अन्न व औषध प्रशासनाचे पथक उद्या दापोलीत जाऊन बर्फ कारखान्यांची पहाणी करणार आहे. अन्न व औषध प्रशासन बर्फ कारखान्यांबरोबर सरबत, गोळा विक्रेत्यांवर धाडी टाकणार आहे. हातगाडीवरचा बर्फ कुठून खरेदी केला याची पावती त्याविक्रेत्याकडून घेऊन तो बर्फ खाण्यायोग्य आहे का? याची तपासणी होणार आहे. तपासणीत बर्फ अयोग्य आढळल्यास तो जागेवरच नष्ट केला जाणार आहे. बर्फाच्या गोळ्यावर मारण्यात येणारा रंगाचीही तपासणी होणार आहे. रस्त्यावरील सरबत आणि गोळा विक्रेत्यांबाबत नगरपरिषदेकडूनही अन्न व औषध प्रशासन माहिती घेणार आहे.

फलक लावून बर्फ कारखानदारांनी झटकली जबाबदारी
“हा बर्फ खाण्यास योग्य नाही. कृपया ग्राहकांनी याची नोंद घ्यावी” असे फलक बर्फ कारखान्याबाहेर झळकू लागले आहेत. हा फलक लावून बर्फ कारखानदार जबाबदारी झटकेल पण हातगाडीवर गोळा किंवा सरबतामध्ये वापरलेला बर्फ नक्की कुठून आणलाय हे आजारी पडल्यावरच शोधायचे का? असा सवाल नागरिक विचारत आहेत.