आयआयटी मुंबईच्या नॅनोथेरपीने कॅन्सरवरील केमोथेरपीला केले वेदनारहित

1

सामना प्रतिनिधी । मुंबई

पोटात अन्नाचा कणही शिल्लक राहत नाही काही खाण्याचा प्रयत्न केला तरी वांत्या होतात. वेदनांनी रुग्ण हैराण होतो. कर्करोगाच्या पेशींना मारण्यासाठी देण्यात येणारी केमोथेरपी बहुतांश रुग्णांना असह्य होते. पवई येथील आयआयटी मुंबईच्या शास्त्रज्ञांनी ही केमोथेरपी वेदनारहित करणारे यशस्वी संशोधन केले आहे. आयआयटी मुंबईतील ‘बायोसायन्सेस ऍण्ड बायोइंजिनीयरिंग’ विभागातील शास्त्रज्ञांनी कर्करोगावर नॅनोथेरपी विकसित केली आहे. या विभागातील वरिष्ठ शास्त्रज्ञा रिंती बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली हे संशोधन झाले. शास्त्रज्ञांनी दोन ‘नॅनो बबल्स’ म्हणजेच सूक्ष्म फुगे बनवले आहेत. त्यामधून केमोथेरपीच्या औषधांचा थेट टय़ूमरवर हल्ला करता येतो. केमोथेरपीत कर्करोगाच्या पेशींबरोबरच शरीरातील चांगल्या पेशीही मारल्या जातात. नॅनो बबल्सद्वारे केमोथेरपी दिल्याने रुग्णाची कर्करोगातून बचावण्याची शक्यताही शंभर टक्के वाढते असे प्रयोगाअंती दिसून आले आहे.

सूक्ष्म फुग्यांचे काम काय?

आयआयटी मुंबईतील शास्त्रज्ञांनी एक उपकरण बनवले आहे ज्यातून दोन सूक्ष्म फुगे रुग्णाच्या रक्तवाहिनीत सोडले जातात. यातील एका फुग्यामध्ये केमोथेरपीची औषधे असतात तर दुसरा गॅसचा फुगा पहिल्याला टय़ूमरपर्यंत पोहोचवण्याचे काम करतो. त्यामुळे रुग्णाच्या चांगल्या पेशींना धक्का लागत नाही. याचा प्रयोग कर्करोगाच्या पेशींवर प्रयोगशाळेत तसेच प्राण्यांवरही केला गेला.

अशी आहे थेरपी…

नॅनोथेरपीतील औषधाचा फुगा 200 नॅनोमीटर तर गॅसचा फुगा हा 500 नॅनोमीटर आकाराचा असतो. अल्ट्रासाऊंड मशीनच्या सहाय्याने रुग्णाच्या शरीरातील या फुग्यांचा प्रवास स्क्रीनवर पाहिला जातो. या प्रक्रियेला ‘यूएसजी गायडेड कॅन्सर थेरपी’ असेही म्हटले जाते. अल्ट्रासाऊंडद्वारेच कर्करोगाच्या गाठींचा वेध घेत हे फुगे तिथपर्यंत पोहोचवले जातात. गाठीपर्यंत फुगे पोहोचले की गॅसचा फुगा फुटतो आणि त्यामुळे औषधांच्या फुग्याला गाठींमध्ये प्रवेश करण्यासाठी मार्ग बनतो. औषधांचा थेट कर्करोगाच्या पेशींवरच हल्ला व्हावा आणि इतर चांगल्या पेशी सुरक्षित राहाव्यात यासाठी जगभरातील शाज्ञज्ञ रात्रंदिवस संशोधन करत आहेत. त्यासाठी एकाच वेळी अनेक औषधांचे मिश्रण करून रुग्णाला द्यायचे असा उपायही केला जात आहे. त्याला ‘कॉम्बिनेशन थेरपी’ असे म्हटले जाते. त्या थेरपीला आयआयटी मुंबईच्या नॅनोथेरपीची जोड मिळाली तर केमोथेरपी शंभर टक्के सुरक्षित आणि रामबाण ठरू शकते असे मत कर्करोगतज्ञांनी व्यक्त केले.