डॉक्टर ऑपरेशन करत होते आणि ती कँडी क्रश खेळत होती

सामना ऑनलाईन | चेन्नई

अवघड अशा ब्रेन ट्युमर सर्जरीचा डॉक्टर सल्ला देतात तेव्हा भल्याभल्यांचे हातपाय गळतात, मात्र एका चिमुरडीने हे संपूर्ण ऑपरेशन ज्या पद्धतीने निभावून नेलं ते बघितल्यानंतर मोठ्या माणसांनीही तोंडात बोटं घातली. जेव्हा ऑपरेशन सुरू होतं,तेव्हा ही मुलगी जागी होती आणि सतत डॉक्टरांना धीर देत होती. तिने या गंभीर परिस्थितीत भीती वाटू नये यासाठी स्वत:च एक शक्कल शोधून काढली .

५ वीत शिकणाऱ्या नंदिनीचं अचानक डोकं दुखायला लागल्याने तिच्या वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या. या चाचण्यांमध्ये तिला ब्रेन ट्युमर झाल्याचं सिद्ध झालं. या ब्रेन ट्यूमरमुळे तिच्या शरीराचा डावा भाग कायमचा निकामी होण्याची भीती होती. त्यामुळे तिच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करणे हाच एक उपाय होता. सर्वसाधारणपणे इतक्या लहान वयाच्या मुलांवर विशेष उपकरणे वापरून ब्रेन ट्युमरची शस्त्रक्रिया केली जात नाही, ही शस्त्रक्रिया मोठ्या माणसांवर केली जाते. मात्र डॉक्टरांनी नंदिनीला असलेला धोका लक्षात घेऊन ही जोखीम ुघ्यायची ठरवली. या शस्त्रक्रियेमध्ये ज्या भागावर शस्त्रक्रिया करायची आहे, त्या भागापुरतीच भूल दिली जाते. शस्त्रक्रियेदरम्यान रूग्ण जागा असतो. नंदिनी ही शस्त्रक्रियेदरम्यान जागीच होती. ती सातत्याने डॉक्टरांना धीर देत होती आणि भीती वाटू नये म्हणून कँडी क्रश गेम खेळत होती. डॉक्टरांनी तिच्या धाडसाचं खूप कौतुक केलंय. नंदिनीची प्रकृती सध्या स्थिर असल्याचं सांगण्यात येत आहे