गतविजेत्या चेन्नई सुपरकिंग्जची बाजी;विराटची बंगळुरू सेना पराभूत

1

सामना ऑनलाईन । चेन्नई

आयपीएलच्या बाराव्या मोसमाला शनिवारी सुरुवात झाली. मात्र पहिल्याच दिवशी दोन्ही संघांकडून धावांचा पाऊस पडेल या आशेने स्टेडियममध्ये आलेल्या क्रिकेटप्रेमींना निराशेला सामोरे जावे लागले. महेंद्रसिंग धोनीच्या गतविजेत्या चेन्नई सुपरकिंग्जने विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवर सात गडी व 14 चेंडू राखून दणदणीत विजय मिळवला आणि स्पर्धेची सुरुवात झकास केली. हरभजन सिंग, इम्रान ताहीर, रवींद्र जाडेजा हे फिरकीवीर विजयाचे शिल्पकार ठरले. या लढतीत दोन्ही संघांनी मिळून 141 धावा केल्या.

71 धावांचा पाठलाग करणाऱया चेन्नई सुपरकिंग्जने अवघे तीन गडी गमावत विजयी लक्ष्य ओलांडले. युजवेंद्र चहलने शेन वॉटसनला शून्यावर बाद करीत मोठा अडसर दूर केला. पण अंबाती रायुडूने 28 धावांची आणि सुरेश रैनाने 19 धावांची खेळी साकारत संघाला विजयासमीप नेले. या आधी हरभजन सिंग, इम्रान ताहीर व रवींद्र जाडेजा या फिरकीवीरांच्या प्रभावी गोलंदाजीसमोर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या स्टार फलंदाजांची डाळ शिजली नाही. सलामीवीर पार्थिव पटेल (29 धावा) यालाच फक्त दोन आकडी धावसंख्या करता आली. विराट कोहली (6 धावा), मोईन अली (9 धावा), ए बी डिव्हिलीयर्स (9 धावा) यांना अपयशाचा सामना करावा लागला. हरभजन सिंगने 20 धावा देत तीन फलंदाजांना, तर इम्रान ताहीरने 9 धावा देत तीन फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.