परदेशातून टपालाने आलेले चेक परस्पर वटविले

सामना प्रतिनिधी । मुंबई

परदेशातून एअरमेलवर आलेल्या चेकमध्ये खाडाखोड करून परस्पर वटविणाऱया टोळीचा क्राइम ब्रँच प्रॉपर्टी सेलने पर्दाफाश केला. पोलिसांनी याप्रकरणी चौघांना अटक केली असून यामध्ये पोस्टाच्या कर्मचाऱयाचाही समावेश आहे. या टोळीने अशाप्रकारे अनेकांना लाखोंचा गंडा घातल्याचे उघड झाले आहे.

आपल्या नावाचा चेक बनावट नावाने खोलण्यात आलेल्या बँक खात्यात वटविण्यात आल्याची तक्रार एका व्यक्तीने गोरेगाव पोलीस ठाण्यात केली. या तक्रारीची गंभीर दखल घेऊन प्रॉपर्टी सेलचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक मेर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दीप बने, लक्ष्मीकांत साळुंखे यांच्या पथकाने तपास सुरू केला. तपासामध्ये आरोपीने तक्रारदाराच्या खात्यावरील मोबाईल नंबर बदलल्याचे स्पष्ट झाले. या मोबाईलच्या आधारे पोलिसांनी संजय जैन, सोहन भानावत, ग्यानचंद परिहार आणि सुनील येरपुडे या चौघांना अटक केली. सुनील येरपुडे हा पोस्टात नोकरीला असून एअर कार्गोमध्ये नेमणुकीला आहे. परदेशातून टपालामार्फत आलेले चेक बाजूला काढून सुनील ते चेक संजय जैन याच्याकडे द्यायचा. संजय जैन हा सोहन आणि ग्यानचंद यांना सोबत घेऊन चेकवर खाडाखोड करून बोगस बँक खात्यावर वटवीत असे. त्यांनी अशाप्रकारे अनेकांना चुना लावल्याचे उघड झाले आहे.