धनदांडग्यांना हाताशी धरून मोदी देश लुटायला निघालेत, छगन भुजबळ यांची फटकेबाजी


सामना प्रतिनिधी । महाड

ज्या अनिल अंबानींनी साधे खेळण्यातले विमान कधी बनवले नाही त्या अंबानींना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या संरक्षणासाठी वापरले जाणारे लढाऊ राफेल विमान बनवण्याचे कंत्राट बहाल केले. हे अत्यंत गंभीर आहे. नोटाबंदी, महागाई, बेरोजगारी आणि शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचे मोदींनी आत्मविश्वासाने दिलेले आश्वासन तर फेल गेलेच, पण त्यांचे शेवटचे राफेलही फेल गेले अशी जबरदस्त फटकेबाजी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी केली.

राज्यातील भाजप सरकारविरोधात राष्ट्रवादीची आजपासून राज्यव्यापी निर्धार यात्रा सुरू झाली. ‘एक चाय बेचनेवाला प्रधानमंत्री देश बेचने निकला है’, असा टोला मोदींना हाणत भुजबळ म्हणाले, नाशिकसारख्या ठिकाणी विमाने बनवण्याचा कारखाना असताना राफेल विमान बनवण्याचे काम त्या कारखान्याला दिले गेले नाही. या कारखान्याने आजवर अनेक लढाऊ व खासगी प्रवासी विमाने बनवली आहेत. या अनुभवी कारखान्याला डावलले. ही शोकांतिका आहे आणि हा निर्णय देशाला आणखीनच देशोधडीला लावणारे आहे. यावरूनच मोदी धनदांडग्यांना हाताशी धरून देश लुटायला निघाले आहेत हे सिद्ध झाले, असा आरोपच भुजबळ यांनी केला. यावेळी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, राष्ट्रीय सरचिटणीस सुनील तटकरे, नवाब मलिक, गणेश नाईक, जितेंद्र आव्हाड यांसह अन्य नेते उपस्थित होते.

दिल्लीतील हुकूमशहा विरोधात आमचा लढा
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनी दिल्लीतील बादशहाविरोधात लढा दिला होता. आताही भाजपच्या सरकारचा कारभार हुकूमशहासारखाच असून याविरोधात आम्ही परिवर्तनाची लढाई सुरू केली आहे. मोदींनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने शेतकरी सन्मान योजना सुरू केली. मात्र ही योजना तळागाळापर्यंत पोहोचलीच नाही. हा महाराजांचा अपमान आहे. इतकेच काय तर या तुघलकी कारभारामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची राज्यघटनाही धोक्यात आली आहे. त्यामुळे या सरकारला खडय़ासारखा बाजूला केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा इशाराच विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी दिला.