नेहमी प्रमाणे अॅक्टिव्ह होणार नाही, छगन भुजबळ यांचं मोठं वक्तव्य

4 मे छगन भुजबळांना सव्वा दोन वर्षानंतर जामीन मंजूर

सामना ऑनलाईन । मुंबई

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना आज केईएम रुग्णालयातून डिसचार्ज मिळाला. यामुळे भुजबळ समर्थकांमध्ये प्रचंड आनंद आहे. भुजबळ परत राजकारणात अॅक्टिव्ह होतील, ते कोणती नवी खेळी खेळणार याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं असतानाच भुजबळ यांनी मात्र आपल्याला नेहमी प्रमाणे अॅक्टिव्ह होण्यास डॉक्टरांनी मनाई केली आहे, असं सांगितलं आहे.

भुजबळ नाशिकला जाणार नाहीत

रुग्णालयातून बाहेर पडताना छगन भुजबळ यांनी वृत्तवाहिन्यांशी संवाद साधला. ‘मी गेले दोन-तीन महिने आजारी आहे. सीटीस्कॅनमध्ये मला स्वादुपिंडाचा आजार असल्याचं समोर आलं. त्यानंतर केईएम रुग्णालयाच्या गॅस्ट्रोएण्ट्रोलॉजी विभागात उपचार करण्यात आले. स्वतः अधिष्ठाता डॉ. अविनाश सुपे आणि अन्य काही डॉक्टरांची टीम माझ्यावर उपचार करत होती. त्यांना यश आलं. आता मला बरं वाटतं आहे. त्यामुळे मला कुटुंबीयांसोबत राहण्यासाठी जाऊ द्या असं मी सांगितलं. मात्र आता नेहमी प्रमाणे अॅक्टिव्ह राहू नका असं डॉक्टरांनी सांगितलं आहे’, असं सांगत भुजबळ यांनी सूचक वक्तव्य केलं आहे.

त्याचबरोबर काही दिवसांनी पुन्हा तपासणीसाठी मला रुग्णालयात यावं लागेलं. आवश्यकता असल्यास शस्त्रक्रिया देखील करण्यात येईल, असंही ते म्हणाले.

दरम्यान, भुजबळ हे रुग्णालयातून थेट त्यांच्या सांताक्रूज येथील घरी जाणार असल्याचं सांगण्यात आलं.